अडचणीत सापडलेल्या उद्धव ठाकरेंना पंकजा मुंडेंचा फोन

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंना द्यायचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे. उद्धव ठाकरेंना हा मोठा धक्का मानला जात आहे. आधी 40 आमदार आणि 13 खासदारांनी साथ सोडल्यानंतर आता पक्ष आणि चिन्हही उद्धव ठाकरेंच्या हातातून निसटलं आहे, त्यातच आता भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.आपण उद्धव ठाकरे यांच्याशी बोललो आहोत, पण काय बोललो हे माध्यमांना सांगणार नाही, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी विस्तृत बोलणं टाळलं. शिवसेनेमध्ये सुरू असलेल्या वादावर मात्र त्यांनी भाष्य केलं आहे.

निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयावर पंकजा मुंडे म्हणाल्या की, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही नेत्यांसमोरचा आत्ताचा काळ कसोटीचा आहे. एक कार्यकर्ता नेत्याचा वारसा होऊ शकतो हा मोठा संदेश एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. तर सत्तेत असल्यामुळे आपल्या सोबत असलेल्यांना भविष्यात निवडून आणणं, ही मोठी संधी शिंदे यांच्याकडे आहे. तर दुसरीकडे नावं नसताना पुन्हा आपला पक्ष उभ करण्याचं मोठं आवाहन उद्धव ठाकरे यांच्यासामोर असल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हंटलं आहे.

निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर भाजप नेत्यांकडून उद्धव ठाकरे यांच्यावर वारंवार टीका करण्यात येत आहेत. अशातच, पंकजा मुंडे यांनी आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबत फोनवरून चर्चा केली असा गौप्यस्फोट केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.