मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी खासदार संजय राऊतांवर नाशिकमध्ये गुन्हा दाखल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर बोलतांना संजय राऊत यांची जीभ घसरली होती. त्यावरून नाशिकमधील शिंदे गटाचे पदाधिकारी योगेश बेलदार यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यावरून संजय राऊत यांच्याविरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात कलम 500 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या अमित शाह यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यावर पलटवर करत असतांना संजय राऊत यांनी आक्षेपार्ह विधान केले होते.

शिवसेना पक्ष चिन्ह आणि नाव शिंदे गटाला बहाल केल्यानंतर ठाकरे गटातील मोठ्या नेत्यावर दाखल करण्यात आलेला पहिलाच हा गुन्हा आहे. अमित शाहांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आक्षेपार्ह विधान केल्यामुळे गुन्हा दाखल झाला आहे.नाशिकचे शिंदे गटाचे नेते योगेश बेलदार यांच्या तक्रारीनंतर पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. कलम 500 नुसार संजय राऊत यांच्या विरोधात बदनामी केल्याचा गुन्हा नोंदवला आहे.

मुख्यमंत्रीपदाच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे तळवे चाटायला गेले. पण निवडणूक आयोगाने दूध का दूध. पानी का पानी केले, असं विधान अमित शाह यांनी केलं होतं. शाह यांचं हे विधान ठाकरे गटाच्या जिव्हारी लागलं आणि वाद सुरू झाला होता दरम्यान शहा यांच्या विधानानंतर पलटवार करताना राऊत यांची जीभ घसरली. त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच आक्षेपार्ह विधान केलं. हे लोक काय चाटत आहेत. ही चाटूगिरी महाराष्ट्रात कधीच झाली नव्हती. चाटूगिरीचं ढोंग आहे. टोकाची चाटूगिरी सुरू आहे. ज्यांची चाटली जातेय ते आम्हाला न्याय देत आहेत, अशी टीका राऊत यांनी केली होती.