मुंबई : मागील सरकारच्या काळात निसर्ग, तोक्ते चक्रीवादळ आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना वर्ष उलटून गेले तरी मदत मिळाली नव्हती असे सांगून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची बोलतीच बंद केली. 2021 च्या मे महिन्यामध्ये राज्याच्या कोकण किनारपट्टी भागात तोक्ते आणि त्यापूर्वी निसर्ग चक्रीवादळ धडकलं होते. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते.
त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली होती. पुढचे 4 दिवस पंचनामे करण्यामध्ये व्यस्त होते. पुढे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर राज्य सरकारनं 1 आठवड्यानंतर मदत जाहीर केली होती. त्यावेळी प्राथमिक मदत म्हणून जाहीर करणं हे राज्य सरकारच्या हातात होते. वर्ष उलटले तरी चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई मिळाली नव्हती.
मागील महाविकास आघाडीचा हा कारभार असताना गेल्या दोन दिवसात झालेल्या गारपीट आणि पावसाच्या नुकसानीवरून विरोधी पक्ष आक्रमक झाला होता. उपमख्यमंत्र्यांनी 24 तासांच्या आत झालेल्या नुकसानीचे आकडे विधानसभेत सादर केले. तरीही जयंत पाटील बोलू लागल्यावर मागील सरकारने शेतकऱ्यांची केलेली फसवणूक उपमख्यमंत्र्यांनी सांगितली आणि पाटील यांची बोलती बंद झाली.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोणत्याही आपत्तीवर केंद्र सरकारकडे बोट दाखविले जात होते. मदत मागितली जात होती. मदतीचे निकषही ठरविण्यासही केंद्राला जबाबदार धरले जात होते. याउलट शिंदे – फडणवीस सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना एनडीआरएफ’च्या निकषाच्या दुप्पट मदत करण्याचा निर्णय घेतला.
मागील सरकारच्या काळात निसर्ग चक्रीवादळ, तोक्ते चक्रीवादळ, अतिवृष्टी या आपत्तीमध्ये मागील सरकारने जिरायती पिकांसाठी हेक्टरी दहा हजार मदत दिली होती. ती १३ हजार ६०० रुपये हेक्टरी केली. बहुवार्षिक पिकांसाठी मागील सरकारने १५ हजार रुपये हेक्टरी दिले होते. ते वाढवून २७ हजार देण्याचा निर्णय घेतला. बहुवार्षिक फळपिकांसाठी मागील सरकारने १८ हजार रुपये हेक्टरी दिले होते. ते ३६ हजार रुपये हेक्टरी आणि मदतीची मर्यादा तीन हेक्टर क्षेत्रापर्यंत वाढविण्यात आली. ‘एनडीआरएफ’च्या निकषानुसार ६५ मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला तरच नुकसान भरपाई दिली जाते. मात्र ६५ मिलिमीटर पावसाचा निकष बाजूला सारून त्यापेक्षा कमी पाऊस झाला असेल आणि शेतीचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले असेल तर मदत देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मगरीचे अश्रू ढाळू नका असे उपमुख्यमंत्री म्हणाल्यावर विरोधक गप्प बसले.
