उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जय किसान, शेतकऱ्यांना एक रुपयांत पिकविमा

मुंबई : नैसर्गिक संकटामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांसाठी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘जय किसान’ची घाेषणा दिली आहे. यंदाच्या अर्थसंकल्प शेतकऱ्यांना समर्पित करत फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक याेजना मांडल्या आहेत.

अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमृतकाळातील पहिला अर्थसंकल्प ‘पंचामृत’ ध्येयावर आधारित मांडला आहे. यामध्ये  शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी,  महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास, भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकासरोजगारनिर्मिती : सक्षम, कुशल, रोजगारक्षम युवा,  पर्यावरणपूरक विकास ही ध्येये ठेवण्यात आली आहेत. 

नैसर्गिक आपत्तीत नुकसान हाेणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी आता शेतकर्‍यांना केवळ 1 रुपयांत पीकविमा मिळणार आहे. आधीच्या योजनेत विमा हप्त्याच्या 2 टक्के रक्कम शेतकर्‍यांकडून घेतली जात हाेती.  आता शेतकर्‍यांवर कोणताच भार पडणार नाही. राज्य सरकार  हप्ता भरणार आहे. यासाठीचा 3312 कोटी रुपयांचा भार राज्य सरकार उचलणार आहे.

त्याचबराेबर मागेल त्याला शेततळे, मागेल त्याला फळबाग, मागेल त्याला हरितगृह असा विस्तार करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील शेतकऱ्यांना मदत देण्यात येणार आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 15 हजार प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार असल्याची घाेषणाही उपमुख्यमंत्र्यांनी केली आहे. शेतकऱ्यांसाठी राज्याकडून नमो शेतकरी महा सन्मान योजनेची घोषणा फडणवीस यांनी अर्थसंकल्पात केली आहे. शेतकऱ्यांना प्रति वर्षी 6000 रुपये निधी मिळणार आहे.