पुणे : जगात सर्वाधिक वेगाने विकसित होणारी महाकाय अर्थव्यवस्था असल्याने भारत जगामध्ये ठळक बातम्यांचा विषय बनला आहे. 2014 मध्ये जगातील 5 नाजूक अर्थव्यवस्थांमध्ये समाविष्ट असलेले आता आम्ही जगातील आघाडीच्या पाच अर्थव्यवस्थांपैकी एक बनलो आहोत, असे प्रतिपादन केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा आणि माहिती आणि प्रसारण मंत्री, अनुराग सिंग ठाकूर यांनी केले.
भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या सहयोगाने आज पुणे इथल्या सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी (SIU), मध्ये चौथी Y20 सल्लामसलत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना ठाकूर म्हणाले, आठ वर्षांच्या कालावधीत 77 हजार स्टार्ट अप्स आणि 107 पेक्षा जास्त युनिकॉर्नमुळे आम्ही स्टार्ट अप्समध्ये जगात तिसऱ्या क्रमांकावर पोहोचलो आहोत. समाज माध्यम प्रणीत सामाजिक समस्या असोत किंवा अब्जावधी डॉलरचे स्टार्टअप असोत, आमचा युवा वर्ग आघाडीवर राहून नेतृत्व करत आहे.
भारताच्या जी20 अध्यक्षपदाचा आणि वाय20 शिखर परिषदेचा संदर्भ देत मंत्र्यांनी सांगितले, अतिशय प्रतिष्ठेच्या जी20 चे यजमानपद भूषवणे हा आमचा मोठा सन्मान आहे. यामुळे जगातील युवा वर्गाला सर्वाधिक भेडसावत असलेल्या समस्यांबाबत एकत्रित प्रयत्नांमध्ये सहभागी होण्याची असाधारण संधी उपलब्ध झाली आहे. या शिखर परिषदेत केवळ भाषण करण्यापुरती भारताची भूमिका मर्यादित नाही तर युवा वर्गाचे म्हणणे ऐकले जावे आणि त्यानुसार जागतिक जाहीरनाम्याची निर्मिती सक्रियपणे व्हावी असा देखील या बैठकीचा उद्देश आहे, असे त्यांनी सांगितले. त्यानुसार वाय20 शिखर परिषद 2023 ने पाच प्रमुख संकल्पना निश्चित केल्या आहेत, ज्या आपल्या युवा वर्गासाठी मार्गदर्शक म्हणून काम करतील. आपले अस्तित्व टिकवण्यासाठी आणि समृद्धी निर्माण करण्यासाठी सुरू असलेल्या आपल्या प्रयत्नांमध्ये बदलत्या काळाच्या वस्तुस्थिती नुसार जगामध्ये सलोखा निर्माण करण्यासाठी तातडीने ज्या मुद्यांची आवश्यकता आहे त्यासंदर्भातील ही प्राधान्यक्रमाची क्षेत्रे आहेत.
