मुंबई : राज्यातील राजकारणात काँग्रेसला अत्यंत दुय्यम भूमिका देण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटांनी केल्याचे स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात लोकसभेसाठी काँग्रेसची केवळ आठ जागांवर बोळवण करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे काँग्रेसच्या राज्यातील नेतृत्वानेही याला मान्यता दिली आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप बाळासाहेबांची शिवसेना या युती सरकारचा मुकाबला करण्यासाठी महाविकास आघाडीमधील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही घटक पक्षांनी निवडणुकांना एकत्रित सामोरे जाण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार लोकसभा मतदारसंघाच्या जागावाटपाला आतापासूनच सुरुवात केली आहे. मागच्या लोकसभा निवडणुकीत जिंकलेल्या जागांचा निकष समोर ठेवून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष २१, काँग्रेस ८ आणि राष्ट्रवादी काँग्रेस १९ अशा प्रकारच्या जागावाटपाचे सूत्र आघाडीच्या बैठकीत मांडण्यात आले.
पदवीधर मतदरासंघाबरोबरच गेल्या महिन्यात पार पडलेल्या कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकांच्या निकालात महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले. या निवडणुका महाविकास आघाडी एकत्रित लढल्याने त्यांना भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांच्या विरोधात चांगली कामगिरी करता आली. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने सत्ताधारी पक्षांच्या विरोधात एकत्रित लढावे, असे वातावरण तयार केले जात आहे.
मात्र या सगळ्यामध्ये काँग्रेसला खिजगणतीतही ठेवण्यात आले नाही. काँग्रेसच्या महाराष्ट्रातील नेत्यांची तोंडे एकमेकांच्या विरोधात आहेत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण एकमेकांचे तोंडही पाहत नाहीत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या बैठकांमध्ये काँग्रेसला आपले म्हणणे मांडणे अवघड जात आहे. काँग्रेसचा राज्य पातळीवरचा एकही नेता एखाद्या मतदारसंघाची जबाबदारी घेण्यास तयार नाही. गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला केवळ एक जागा मिळाली होती. या जागेवरही शिवसेनेकडून उमेदवार आयात करावा लागला होता. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनाही पराभवाचा धक्का बसला होता. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत उमेदवारच नाही अशी काँग्रेसची स्थिती आहे. त्यामुळे ठाकरे गट आणि राष्ट्रवादीच्या दयेवर मिळतील तेवढ्या जागा पदरात पाडून घ्याव्यात असे काँग्रेस नेत्यांना वाटत आहे.
