मी गृहमंत्री झाल्यामुळे अनेक लोकांची अडचण, बेकायदेशीर कामे करणाऱ्यांना साेडणार नाही, उपमुख्यमंत्र्यांचा इशारा

नागपूर : मी गृहमंत्री झाल्यामुळे अनेक लोकांची अडचण झाली आहे. आता जे लोके बेकायदेशीर काम करतील त्यांना सोडणार नाही. त्यांच्यावर कारवाई होईल. कायद्यानेच या ठिकाणी राज्य चालेल असा टाेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना लगावला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीसांना गृहमंत्रालयाची जबाबदारी झेपत नसेल तर त्यांनी राजीनामा
द्यावा, असे म्हटले हाेते.

त्यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, अनेक लोकांना मनातून असे वाटतेय की, मी गृहमंत्री राहिलो नाहीतर बरं होईल. पण मी त्या सगळ्यांना सांगू इच्छितो मी गृहमंत्री राहणार आहे. मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री पदाचा पदभार दिलाय. जे चुकीचे आणि बेकायदा काम करतील त्यांना शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही. गृहमंत्री म्हणून यापूर्वी मी 5 वर्षे पद सांभाळले आहे. आता जे लोके बेकायदेशीर काम करतील त्यांना सोडणार नाही. त्यांच्यावर कारवाई होईल. मी कोणाला घाबरत नाही, कोणाला दबतही नाही, जे कायदेशीर आहे तेच करतो, कायद्यानेच वागतो. कायद्यानेच या ठिकाणी राज्य चालेल.’

महाराष्ट्रात दंगली होणे ही खूप गंभीर बाब आहे. देवेंद्र फडणवीसांना गृहमंत्रालयाची जबाबदारी झेपत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा. राज्यातल्या दंगली आणि संजय राऊतांच्या धमकी प्रकरणात देवेंद्र फडणवीसांनी लक्ष घातले पाहिजे. मी खासदार संजय राऊत यांच्याशी या विषयावर बोलणार आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी देखील बोलणार आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या.