अद्वय हिरे यांच्यावर 32 काेटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा

नाशिक :  ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांच्यासह ३२ जणांवर ३२ काेटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  अद्वय हिरे यांच्या रेणूकादेवी यंत्रमाग औद्योगिक संस्थेवर ३२ कोटींची थकबाकी आहे. पण बँकेची दिशाभूल केल्याप्रकरणी आयोशानगर पोलिस स्थानकात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  


काही महिन्यांपूर्वी महात्मा गांधी विद्या मंदीर संचलित आदिवासी सेवा समितीमध्ये नोकरी देतो, असे आश्वासन देत हिरे यांच्या काही समर्थकांनी लोकांकडून लाखो रुपये उकळले होते.  नोकरी दिली गेली नाहीच पण त्यांना पैसेही परत करण्यात आले नाहीत. गेल्या आठवड्यात उध्दव ठाकरेंची मालेगावात सभा असतानाच फसवणूक झालेल्या लोकांनी धरणे आंदोलन सुरु केले. सटाणा पोलिस ठाण्यात हिरे व त्यांच्या काही सहका-यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली. दुस-याच दिवशी पुन्हा त्या लोकांनी महात्मा गांधी पुतळ्या समोर धरणे आंदोलन केले. त्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिका-यांनी आंदोलनकर्त्यांना आरोपींवर योग्य ती कारवाई करुन गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले होते.