राष्ट्रवादीतील काही लोक फुटतील, याला शरद पवारांची मुक संमती – संजय शिरसाट

राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसात घडामोडींना वेग आला आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्या बैठकांमध्ये वाढ झाली आहे. आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून घडामोडी घडू लागल्या आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात ‘सिल्व्हर ओक’ वर बैठक झाली होती. या बैठकीत शरद पवारांनी मोठा खुलासा केला. भाजपाबरोबर जाण्यासाठी कुटुंबाला लक्ष्य केलं जात आहे. कुणाला व्यक्तिगत निर्णय घ्यायचा असेल, तर तो त्यांचा प्रश्न आहे. पण, पक्ष म्हणून आम्ही भाजपाबरोबर जाणार नाही, असं शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना सांगितल्याचा दावा संजय राऊतांनी सामनाच्या ‘रोखठोक’ मधून केला आहे.

त्यातच आता शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी मोठा दावा केला आहे.एका माध्यमाशी बोलताना शिरसाटांनी यावर भाष्य केले आहे. ते म्हणाले की,’उद्धव ठाकरेंना बोलवून शरद पवारांनी इशारा दिला असावा, असं माझं मत आहे. दीड तासांची बैठक चहा, पाणी करून किंवा एक वाक्य बोलून होत नसते. शरद पवारांनी उद्धव ठाकरेंचा कार्यक्रम वाजवायचा होता तो वाजवलेला आहे. राष्ट्रवादी सत्तेशिवाय राहत नसून, त्यासाठी ते कुणाबरोबरही युती करण्यात तयार असतात. त्यामुळे महाविकास आघाडीत त्यांना राहायचं नाही. त्यांचा कल भाजपाकडे आहे. म्हणून ते भाजपाबरोबर जातील. राष्ट्रवादीतील काही लोक फुटतील. कारण, याला शरद पवारांची मुक संमती आहे. अजित पवार, प्रफूल पटेल आणि सुनील तटकरे यांनी अमित शाहांबरोबर ८ एप्रिलला ठरवून बैठक केली. उद्या राष्ट्रवादी भाजपाबरोबर आल्यास नवल वाटण्यासारखं काहीच नाही, असा खळबळजनक दावा शिरसाटांनी केला.

अजित पवार भाजपाबरोबर गेल्यास शिवसेनेची भूमिका काय असणार? असा प्रश्न विचारल्यावर संजय शिरसाट म्हणाले, “अजित पवारांना त्यांची कातडी वाचवायची आहे. अनिल देशमुख, नवाब मलिक, हसन मुश्रीफ यांचीही ईडी चौकशी सुरु आहे. मग, यांना भीती नाही का? फक्त तुम्हालाच भीती आहे का? हे सर्व खोटं आहे. मात्र, आम्ही राष्ट्रवादीला बरोबर घेणार नाही. भाजपाने काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे,” असेही शिरसाटांनी स्पष्ट केलं.