ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख जल संघर्ष यात्रा घेऊन नागपूरच्या सीमेवर दाखल झाले आहेत. मात्र पोलिसांनी त्यांची संघर्ष यात्रा मध्येच अडवली आहे. आता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. 10 एप्रिल रोजी अकोल्यातून यात्रेला प्रारंभ झाला होता. उद्या नितीन देशमुख आणि त्यांचे सहकारी खारपण पट्ट्यातील पाणी समस्येला घेऊन उपमुख्यमंत्री आणि अकोल्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानासमोर जाऊन आंदोलन करणार होते. मात्र, त्यापूर्वीच नितीन देशमुख आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना पोलीस ताब्यात घेतलं आहे. जवळपास 500 च्या वर कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे.
अकोल्याचे ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी अकोल्यापासून नागपूरपर्यंत पाणी प्रश्नावर संघर्ष यात्रा सुरू केली. आज सकाळी 8 वाजता ही संघर्ष यात्रा नागपूरच्या वेशीवर धडकली. मोर्चेकरी देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जाऊन आंदोलन करणार होते. त्यामुळे नागपूरच्या वेशीवरच वडधान्ना येथे पोलिसांचा मोठा बंदोस्त ठेवण्यात आला होता. तसेच दत्तवाडी परिसरातही पोलिसांची अधिक कुमक तैनात करण्यात आली होती. ही संघर्ष यात्रा नागपूरच्या वेशीवर येताच पोलिसांनी आंदोलकांना वेशीवरच अडवलं. त्यांना पुढे जाण्यास मज्जाव केला. फडणवीस यांच्या घरापर्यंत जाण्याची आंदोलकांनी परवानगी मागितली होती. पोलिसांनी ही मागणी फेटाळून लावली. त्यामुळे आंदोलक आणखीनच भडकले. आंदोलकांनी नागपूरच्या वेशीवर रस्त्यावरच बसून जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली.
पोलिसांनी नितीन देशमुख आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना अमरावतीच्या दिशेने पोलिस घेऊन गेले. दरम्यान आता मागे हटणार नाहीत. आता ही यात्रा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी घेऊन जाऊ असा इशारा देशमुख यांनी दिला आहे.
