अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदावर बसून खदखद निर्माण करण्यापेक्षा बाहेर राहून खदखद व्यक्त करायला हवी होती – नाना पटोले

काल एका मुलाखतीत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी अनेक गोष्टी सांगितल्या. यावेळी अजित पवार बोलताना म्हणाले की, मला शंभर टक्के मुख्यमंत्री व्हायला आवडेल. त्यासाठी 2024ची वाट का पाहायची? असा सवाल करत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपली महत्त्वकांक्षा जाहीर केली. राष्ट्रवादीत फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच त्यांनी हे विधान केल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे अजितदादा काहीही करू शकतात. कोणत्याही क्षणी कोणताही निर्णय घेऊ शकतात अशा चर्चा दबक्या आवाजात सुरू झाल्या आहेत.

अजित पवारांच्या या विधानावर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते. अजित पवारांच्या या विधानावर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार यांनी मुलाखतीवेळी एका प्रश्नाचं उत्तर देताना पृथ्वीराज चव्हाणांच्या काळात नाईलाजाने काम केलं असं म्हणाले यावर बोलताना पटोले म्हणाले की, नाईलाज हा शब्द वापरण्यापेक्षा तुम्ही शपथ नव्हती घ्यायची. तुम्ही पदावर बसून खदखद व्यक्त केली त्यापेक्षा पदावर न बसता खदखद व्यक्त करायला हवी होती. या व्यक्तव्याची अपेक्षा आम्हाला नव्हती. प्रत्येक मुख्यमंत्री या राज्याला काही ना काही देऊन गेला. त्यामुळे असं वक्तव्य करणं चुकीच आहे. तुम्हाला तेव्हा काही गोष्टी आवडल्या नाहीत तर त्याचवेळी त्यांनी बोलायला हवं होतं असंही पटोले यावेळी म्हणाले आहेत.