जितेंद्र आव्हाड पाकिस्तानची भाषा बोलतात, त्यांना अटक करा; भाजप आक्रमक

जितेंद्र आव्हाड हे पाकिस्तानची भाषा करतात. रामनवमी आणि हनुमान जयंतीत शोभा यात्रा भारतात नाही काढायची तर काय पाकिस्तानात काढायची का? असा सवाल भाजपने केलाय. या सणांतील शोभायात्रेवरून आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा त्यांना अटक करा, या मागणीसाठी भाजप आक्रमक झाली आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात लवकरात लवकर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली पाहिजे.जर हिंदू धर्माचा त्यांनी सातत्याने अपमान सुरुच ठेवला तर तर जितेंद्र आव्हाड जितेंद्र जिथे दिसतील त्यांचे चप्पलेने स्वागत केले पाहिजे, असं वक्तव्य भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांनी केलंय. मुंबईत आज त्यांनी जितेंद्र आव्हाडांविरोधात तक्रार दाखल केली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरात आव्हाड म्हणाले की, औरंगाबादला दंगल झाली. आता रामनवमी आणि हनुमान जयंती उत्सव दंगलीसाठीच झालाय की काय असे वाटते. यंदाचे वर्ष जातीय दंगलीचे आहे. कारण हे नोकऱ्या देऊ शकत नाहीत.भाव कमी करू शकत नाहीत. राजकीय अस्थिरता कमी करू शकत नाहीत. राजकीय अवमूल्यन झालेले आहे. सगळ्या बाजूंनी उतार लागलेला आहे. सर्वात सोपे काय आहे, असे धार्मिक सोहळे करा. त्या सोहळ्यातून मते जमा करा. नाहीच जमले, तर आग लावून टाका. आव्हाडांच्या याच वक्तव्यावरून आता भारतीय जनता पक्ष आक्रमक झाला आहे.

जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याचा निषेध करत आज अंधेरी पोलिस ठाण्यासमोर भाजपने निदर्शने केली. तसेच जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात कलम 153 अंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली. भाजपच्या वतीने तशी तक्रार पोलिस ठाण्यात देण्यात आली. आता यावर पोलिस काय कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे.