उद्धव ठाकरे आजारी असताना इकडे आदित्य ठाकरे मुख्यमंत्री बनण्याचं षडयंत्र रचत होते. त्यासाठी आदित्य ठाकरे यांनी जसलोक रुग्णालयाच्या एका खोलीत बैठकाही घेतल्या होत्या पण महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विरोध केला म्हणून आदित्य ठाकरे यांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न भंगलं, असा खळबळजनक दावा भाजप नेते नितेश राणे यांनी केला आहे. बारसूतील आंदोलकांना हुसकावून लावण्याचे आदेश फडणवीस यांनी मॉरिशसवरून दिल्याचं राऊत म्हणत आहेत. हा तिथे कशाला गेला? आदेश मातोश्रीवरून आलेत. विनायक राऊतचा मोबाईल तपासा, असं आव्हानच नितेश राणे यांनी दिले.
उद्धव ठाकरे जेव्हा आजारी होते तेव्हा आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं. मुख्यमंत्री होण्यासाठी आदित्य ठाकरेंनी स्वतःच्या आईवर दबाव आणला होता. जोपर्यंत माझं नाव पुकारलं जात नाही तोपर्यंत दाओस मधून येणार नाही असं म्हणाला होता. दावोसच्या नावाखाली आदित्य ठाकरे लंडनला होते, असा गौप्यस्फोटही नितेश राणेंनी केला.
आदित्य ठाकरे मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न पाहात होते. षडयंत्र रचत होते. माझे वडील आजारी आहेत. आता ते बरे होणार नाहीत असं आदित्य ठाकरे सांगायचे. त्यासाठी जसलोक रुग्णालयात बैठका झाल्या. जसलोकच्या कोणत्या रुममध्ये बैठका होत होत्या हे मी सांगू शकतो. सीसीटीव्ही फुटेज देऊ शकतो. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विरोध केला म्हणून ते प्रकरण थांबलं. बाप आजारी असताना आदित्य ठाकरे हे वरुण सरदेसाईंना घेऊन दावोस गेले होते. तिथे ते मजा मारत होते.” असा दावाही त्यांनी केला.
