संजय राऊतांना महाविकास आघाडीत मनभेद निर्माण करायचे आहेत का? छगन भुजबळ यांचा सवाल

ठाकरे गटाचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस मधून संताप व्यक्त होत आहे. राऊतांना महाविकास आघाडीत मनभेद निर्माण करायचे आहेत का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत सामना मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत बाबींवर लिहित आहेत. अजित पवार भाजपच्या वाटेवर आहेत असे सुचित करत आहेत. सोमवारी तर त्यांनी थेट शरद पवारांचे नवीन नेतृत्व घडविण्यात अपयश असल्याचा आरोप अग्रलेखातून केला होता.भुजबळ यांनी राऊत यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. राऊतांना हे सगळे उकरून काढायची काय गरज आहे असे त्यांनी विचारले आहे. उद्धव ठाकरे समंजस भूमिका घेत असताना राऊत कलगीतुरा लावत आहेत असेही त्यांनी म्हटले आहे.

भुजबळ म्हणाले, शरद पवारांनी लोक माझे सांगाती या पुस्तकात काही निरीक्षणे नोंदवली होती. उद्धव ठाकरे दोनच दिवस मंत्रालयात आले हे काही आमच्या पचनी पडले नव्हते, असे त्यांनी म्हटले होते. त्याच्यावर अगदी सौम्य शब्दांत उद्धव ठाकरे यांनी सांगितले ती मला महाविकास आघाडीमध्ये बिघाडी करायची नाही. त्यामुळे मी या प्रश्नोत्तरात भाग घेऊ इच्छित नाही. मला हा कलगीतुरा लावायचा नाही.

भुजबळ म्हणाले, सामना मधले सगळे संपादकीय संजय राऊत लिहितात हे आम्हाला माहिती आहे. त्यांना हे सगळं उकरून काढायची काय गरज आहे? त्यांना काय अडचण आहे? त्यांना असे वाटते का की राष्ट्रवादीने महाविकास आघाडीतून बाहेर पडावे. आघाडीमध्ये मनभेद निर्माण व्हावेत. पवार साहेब फार ज्येष्ठ नेते आहेत. तुमचे जेवढे आयुष्य असेल तेवढे त्यांचे राजकारण आहे, असा टोलाही भुजबळ यांनी संजय राऊत यांना लगावला .शरद पवार मॅच्युअर नेते आहेत. कुठे काय करायचं याची त्यांना चांगली कल्पना आहे. महाविकास आघाडीमध्ये सुप्रियाताई,अजितदादा जयंतराव हे काम करायला समर्थ आहेत. त्यांच्यावर जबाबदारी टाकली जाईल ते समर्थपणे पेलणारे कार्यकर्ते नेते आहेत. त्याची इतरांनी काळजी करायचे कारण नाही, असे त्यांनी राऊत यांना निक्षून सांगितले आहे.