शरद पवार यांचा नैतिकतेशी संबंध आहे का? आता जर पवारसाहेबांनी भाजपला नैतिकता शिकवायची ठरवली तर कठीणच जाईल. इतिहासात जावे लागेल. वसंतदादांचे सरकार कसे गेले येथपासून सुरूवात होईल ना? अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना फटकारले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा वसंत दादा पाटील यांचे सरकार पाडताना शरद पवार यांनी त्यांच्या पाठीत खंजीर कसा खुपसला याची चर्चा सुरू झाली आहे. किंबहुना पाठीत खंजीर हा वाक्प्रचार आणि शरद पवार हे एक समीकरण बनले आहे.
आणीबाणीनंतर देश पातळीवर यशवंतराव चव्हाण आणि ब्रह्मानंद रेड्डी यांनी इंदिरा गांधी यांचं नेतृत्व झुगारून देत, ‘रेड्डी काँग्रेस’ची स्थापना केली. शरद पवार यांनीही या कठीण प्रसंगात इंदिरा गांधींची साथ सोडली. 1978 मध्ये झालेल्या निवडणुकीत जनता पक्ष 99 जागांसह महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष बनला. इंदिरा काँग्रेसला 62, रेड्डी काँग्रेसला 69 ,शेतकरी कामगार पक्षाला 13, माकपला 9 आणि अपक्षांना 36 जागा मिळाल्या होत्या.
तरीदेखील सत्तेसाठी दोन्ही काँग्रेस एकत्र आल्या. वसंतदादा पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. शरद पवार हे या मंत्रिमंडळात उद्योगमंत्री होते. 2019 मध्ये सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी जसे काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आले तसाच हा प्रकार होता. मात्र खरा ड्रामा तर पुढेच घडला.1978 सालच्या जुलै महिन्यात विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच शरद पवार यांनी 40 आमदार घेऊन वसंतदादांच्या सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. पवारांनी ‘समाजवादी काँग्रेस’ची स्थापना केली आणि पुन्हा एकदा सत्ता स्थापनेचे खेळ सुरू झाले. ज्या जनता पक्षाच्या विरोधात लढले होते त्यांच्याचसोबत शरद पवारांनी पुरोगामी लोकशाही आघाडी स्थापन केली आणि ते मुख्यमंत्री बनले.
शिंदे फडणवीस सरकारवर विरोधक बेकायदेशीर असल्याचा आरोप करतात. पवारांचे सरकार तर त्यापेक्षाही बेकायदेशीर होते. मात्र त्यावेळी पक्षांतरबंदी कायदा नसल्याने कोर्टकचेऱ्या झाल्या नाहीत. पवार मुख्यमंत्री बनले पण गद्दार हा शब्द त्यांच्या नावाची कायमचा जुळला. शरद पवारांनी पाठीत खंजीर खुपसला ही काँग्रेसजनांची भावना तेव्हापासून आजपर्यंत कायम आहे.
शरद पवार यांचे पुलोदचे सरकार दोन वर्षातच नव्याने पंतप्रधान झालेल्या इंदिरा गांधी यांनी बरखास्त केले. त्यानंतर पाच वर्ष शरद पवार विरोधकांच्या भूमिकेत होते. मात्र पुन्हा एकदा त्यांनी आपल्या कथित समाजवादी विचाराला तिलांजली देत राजीव गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 1999 पर्यंत शरद पवार काँग्रेसमध्ये राहिले. काँग्रेस सत्तेवर येण्याची चिन्हे दिसेनात त्यामुळे त्यांनी सोनिया गांधी यांच्या परदेशी असल्याचा मुद्दा काढला. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली.
1999 च्या निवडणुका काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने वेगवेगळ्या आणि एकमेकांविरुद्ध लढवल्या होत्या. मात्र सत्तेची संधी दिसताच पवारांनी पुन्हा काँग्रेसबरोबर आघाडी केली. सत्ता असेल तोपर्यंत काँग्रेसला चिकटून राहायचे. सत्ता दिसत नाही म्हटल्यावर काँग्रेसशी फारकत घ्यायची ही शरद पवारांची कायमच निती राहिली आहे. 2014 मध्ये देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट आली. लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचा धुव्वा उडाला. त्यामुळे पवारांनी पुन्हा एकदा काँग्रेस बरोबरच्या आघाडी मोडली. 2014 च्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेसने एकट्याने लढवल्या.
भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला तरी बहुमताला काही जागा कमी पडत होत्या. सत्तेच्या अपेक्षेने शरद पवार यांनी न मागताच भाजपला पाठिंबा देऊन टाकला. मात्र आपला वर्षानुवर्षांचा युतीतील साथीदार असलेल्या शिवसेनेसोबत विश्वासघात करायचा नाही ही भूमिका भाजपने घेतली. शिवसेनेला मंत्रिमंडळात सहभागी करून घेतले. त्यामुळे पवारांचा डाव फसला.
2019 मध्ये समोर काही दिसेना म्हणून पवारांनी पुन्हा काँग्रेसशी जुळवून घेतले. निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीला निर्विवाद बहुमत मिळाले. मात्र यावेळी युतीमध्ये खोडा घालत पवारांनी काँग्रेस, राष्ट्रवादी, आणि शिवसेना ही अनैसर्गिक आघाडी बनविली. मात्र शिवसेनेतीलच बहुतांश नेते कार्यकर्त्यांना हे मान्य नसल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासह चाळीस आमदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली हे आपल्याला माहितीच आहे.
पवारांच्या या सगळ्या कोलांट्याउड्या माहित असलेले कोणीही त्यांच्याकडून नैतिक राजकारणाची अपेक्षा करत नाही. त्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांनी पवारसाहेबांनी भाजपला नैतिकता शिकवायची ठरवली तर कठीणच जाईल. इतिहासात जावे लागेल, असे म्हटले आहे.
