त्र्यंबकेश्वर मंदिरातील घटनेची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून गंभीर दखल; एसआयटी चौकशीचे आदेश

त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश करण्यासाठी विशिष्ट जमावा मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर एकत्र झाल्याच्या कथित घटनेसंदर्भात एफआयआर नोंदवून कडक कारवाई करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. तर दुसरीकडे प्रवेश करण्याचा वाद निरर्थक असल्याचा दावा पोलिसांनी केलेला असून हा वाद गैरसमजातून झाल्याचे नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमप यांनी स्पष्ट केले.

या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची ब्राम्हण महासंघाची मागणी केली. राज्यातील अनेक भागांत तणावाची परिस्थिती असताना त्र्यंबकेश्वरमध्ये देखील घडला धक्कादायक प्रकार आहे. कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा ब्राह्मण महासंघाने दिला होता. आता या प्रकरणाची चौकशी एसआयटी करणार आहे.त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश करण्यासाठी एक विशिष्ट जमाव मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर एकत्र झाल्याच्या कथित घटनेसंदर्भात एफआयआर नोंदवून अत्यंत कडक कारवाई करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या घटनेची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिरिक्त पोलिस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत.

त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारावर हिंदूधर्मीयांशिवाय कुणालाही प्रवेश नसल्याचा फलक आहे. पुरोहितांच्या विरोधाचे तेच कारण होते. या प्रकरणी पुरोहित संघाने त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी रविवारी शांतता समितीची बैठक बोलावत दोन्ही गटांना समज देऊन हा वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. या घटनाक्रमानंतर मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.