राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. औरंगाबादमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडींवर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार म्हणाले होते की, देशात सध्या मुस्लिम आणि ख्रिश्चन या दोन धर्मांबाबत चिंता वाटावी, अशी परिस्थिती आहे.लोकांनी एकजुटीने द्वेषाच्या विरोधात उभं राहिलं पाहिजे. देश आणि समाज एकसंघ ठेवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजेमुस्लिम समाजात चार-दोन चुका होऊ शकतात, तशा गोष्टी हिंदूंकडूनही होऊ शकतात. व्यक्तिगत कारणातून समाज आणि चर्चवर हल्ला करणे चूक आहे. असे शरद पवार म्हणाले.
दरम्यान, धार्मिक मुद्द्यावर केलेलं विधान चर्चेत आल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवारांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. “ख्रिश्चन व मुस्लीम समाज धोक्यात आहे असं मी म्हणालो, कारण ओडिशा आणि इतर काही राज्यांमध्ये चर्चवर हल्ले झाले आहेत. चर्च आणि ख्रिश्चन समाज तसा शांतताप्रिय असतो. एखाद्याची काही चूक असेल, तर पोलीस कारवाई करावी. त्यासाठी धार्मिक स्थळावर हल्ला का करायचा?” असं शरद पवार म्हणाले.
दरम्यान, शरद पवारांचं विधान आणि त्यावरचं स्पष्टीकरण आल्यानंतर त्यासंदर्भात भाजपा नेते निलेश राणे यांनी खोचक ट्वीट केलं आहे. एका वृत्तवाहिनीच्या व्हिडीओचा स्क्रीनशॉट शेअर करून त्यावर निलेश राणेंनी शरद पवारांना लक्ष्य करणारं ट्वीट केलं आहे. “निवडणूक जवळ आली की पवार साहेब मुस्लीम समाजासाठी चिंताग्रस्त होतात. कधीकधी वाटतं, औरंगजेबाचा पुनर्जन्म म्हणजेच शरद पवार”, असं या ट्वीटमध्ये शरद पवार म्हणाले आहेत.
