आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना चांगल्याच कडक शब्दांत सुनावलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीच बोलण्याचा ठेका घेतला आहे का? असा प्रश्न रोहित पवार यांनी आपल्या पक्षाच्या बड्या नेत्यांना विचारला आहे. राष्ट्रवादीचे इतर नेते का बोलत नाहीत? वाचाळवीरांना का प्रतिक्रिया देत नाहीत? असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे. रोहित पवार यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना आपली उद्विग्नता व्यक्त केली. त्यांच्या या भूमिकेवर राष्ट्रवादीचे बडे नेते काय प्रतिक्रिया देतात ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.
“शरद पवारांनी अनेक नेत्यांना मोठं केलं. पण, शरद पवार यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन बोललं जातं, तेव्हा कार्यकर्तेच लढतात. ही गोष्ट पाहिल्यावर मलाही खंत वाटते. ज्या नेत्यांनी पद भूषावली आहेत, ते याबद्दल काहीच बोलत नाहीत. फक्त अजित पवारांनी प्रतिक्रिया व्यक्त केली असून, बाकीचे सर्व शांत बसले आहेत. आम्ही कार्यकर्ता म्हणून लढत राहू. शरद पवारांवर जो कोणी बोलेल, त्याला उत्तर देऊ. पण, नेते गप्प का बसतात हे कळत नाही,” अशी संतप्त प्रतिक्रिया रोहित पवारांनी व्यक्त केली आहे.
सुधीर मुनगंटीवार साहेबांकडून ही अपेक्षा नव्हती. पण पवार साहेबांनी अनेक नेत्यांना मोठं केलं. अनेक नेत्यांनी पद भूषवली. जेव्हा पवारसाहेबांवर एखादा खालच्या पातळीवर जावून बोलतो तेव्हा फक्त कार्यकर्तेच बोलतात. तेव्हा मला सुद्धा खंत वाटते. ज्या नेत्यांनी पदं भुषवली ते नेते याबाबत काहीही बोलत नाही. फक्त अजितदादाच याबाबत बोलले बाकी कोणीही नेता बोललेला नाही. मला एवढेच सांगायचे आहे की, आम्ही कार्यकर्ते लढत राहू, पण नेते अशा प्रकरणावर का गप्प बसतात ते कळत नाही, असे म्हणत त्यांनी पक्षातील नेत्यांवर आगपाखड केली आहे.
दरम्यान, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी बोलताना शरद पवार व रोहित पवारांवर जहरी टीका केली होती. त्यानंतर रोहित पवारांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. यानंतर आता पक्षातील इतर कोणी नेते बोलणार का ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
