जे स्वतःच्या कर्तुत्वाने पुढे जातात, त्यांची कुणी कोंडी करू शकत नाही; अजित पवार यांनी केले देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक

शिवसेनेच्या जाहिरातीमुळे सुरू असलेल्या राजकीय गदारोळात विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले आहे. जे स्वतःच्या कर्तुत्वाने पुढे जातात त्यांची कुणी कोंडी करू शकत नाही, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.

शिवसेनेच्या जाहिरातीत देवेंद्र फडणवीस यांना डावलले होते. त्यांची कोंडी कोण करत आहे असे तुम्हाला वाटते असा प्रश्न विचारला असता अजित पवार म्हणाले, जे स्वतःच्या कर्तुत्वाने पुढे जातात त्यांची कुणी कोंडी करू शकत नाही. कोंबडा कितीही झाकला तरी तो आरवायचा काही राहत नाही. जो कर्तुत्वसंपन्न असतो, ज्यांच्यामध्ये नेतृत्वाचे गुण असतात, संघटना कौशल्य असते, पुढे जाण्याची ताकद असते त्याला कोणी थांबवण्याचा प्रयत्न केला तरी थांबविले जाऊ शकत नाही. हे निर्विवाद सत्य आपल्या देशात गेल्या 75 वर्षात वेळोवेळी सिद्ध झाले आहे. काही वेळेस काहींना दोन पावले मागे थांबावे लागते. पण पुन्हा ते जास्त गतीने पुढे जातात.

पवार म्हणाले, मी गेले कित्येक वर्ष देवेंद्र फडणवीस यांचे कामकाज बघतोय. पाच वर्ष मुख्यमंत्री म्हणून सुद्धा त्यांचे कामकाज तुम्ही बघितले आहे. त्यांच्या मागे आमदारांचाही संच आहे. ज्यावेळी मुख्यमंत्री पदाचे नाव घोषित केले, ते सर्व राजकारण झाले, त्यावेळी सागर बंगल्यावर 85 ते 90 आमदार एकत्र जमले होते. ते काही वेगळे करू शकत नाहीत. पण किमान त्यांच्या मनात आले की आपण काही वेगळे करू शकतो का? भारतीय जनता पक्षाचे दोन सर्वोच्च नेते आज एवढे पॉवरफुल आहेत की त्यांच्या विरोधात पक्षांतर्गत कोणी काही करूच शकत नाही. पण तशा पद्धतीची चर्चा झाली. तेथे रडारडीही झालेली तुम्हाला माहिती आहे.