एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने वर्तमानपत्रात छापलेल्या पानभर जाहिरातींवरुन भाजपच्या काही नेत्यांमध्ये नाराजी असल्याचं दिसत आहे. त्यातच भाजपच्या नेत्याने थेट उद्धव ठाकरे यांनाच मैत्रीची खुली ऑफर दिल्यामुळे राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या आहेत. बरं ही मैत्रीची दारं किलकिली करणारे नेते कुणी साधे-सुधे नसून एका मोठ्या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत.कल्याणमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये वादाची पहिली ठिणगी पडल्याचं पाहायला मिळालं. मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी राजीनामा देण्याची तयारीही दर्शवली. त्यानंतर बहुतांश मराठी वृत्तपत्रांमध्ये छापून आलेल्या जाहिरातीत एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा अधिक असल्याचा दावा करण्यात आला होता.
राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ जाहिरातीवरून राज्यातील राजकीय वातावरणं तापलं आहे. जाहिरातीमुळे भाजपा नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालं आहे. अशातच भाजपा नेत्याने शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मैत्रीची ऑफर दिली आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
मोदी@ ९ महाजनसंपर्क अभियानाच्या निमित्ताने उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. मौर्य यांनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. “उद्धव ठाकरेंसाठी भाजपाची दारं उघडीच आहेत,” असं मौर्य म्हणाले आहेत. पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मौर्य यांनी महागाई वाढली असल्याचं म्हटलं. “मागील साडे तीन वर्षाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८० कोटीहून अधिक नागरिकांना रेशन दुकानावर मोफत अन्नधान्य देण्याच काम केलं आहे. शेतकर्यांना केंद्राकडून ६ हजार आणि राज्य सरकार ६ हजार अशी एकूण १२ हजारांची मदत दिली जात आहे. तर, दुसर्या बाजूला देशात निश्चित महागाई वाढली आहे. ही महागाई नियंत्रणात आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रयत्न करीत आहे
उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र आहेत. त्यांच्या मनात काही विचार असतील, तर आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा करावी. भाजपाचे दरवाजे बंद नसतात. भाजपाचे दरवाजे उघडीच असतात. पण, उद्धव ठाकरेंना चर्चा करण्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल. भाजपा चर्चेचा प्रस्ताव ठेवणार नाही. कारण, त्यांनी चूक केली आहे, भाजपाने चूक केली नाही,” असं मौर्य यांनी सांगितलं.
