दहशतवाद्यांचा एलओसीवर घुसखोरीचा प्रयत्न फसला; कुपवाडामध्ये सुरक्षा दलाकडून 5 दहशतवाद्यांचा खात्मा

काश्मीरच्या कुपवाडामध्ये सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे. शुक्रवारी सकाळी शोध मोहिमेदरम्यान 5 पाकिस्तानी दहशतवादी मारले गेले. गुप्त माहितीच्या आधारे लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी परिसरात शोध मोहीम राबवली होती आणि या शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. सुरक्षा यंत्रणा आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या या चकमकीत 5 पाकिस्तानी दहशतवादी मारले गेले आहेत.’

हे सर्व दहशतवादी पाकिस्तानातून घुसले होते आणि येथे मोठा हल्ला करण्याच्या तयारीत होते. चकमकीनंतरही शोधमोहीम सुरूच आहे, जेणेकरुन अन्य कोणी अतिरेकी राहिल्यास त्याला पकडता येईल. काश्मीरमध्ये या वर्षातील हा सर्वात मोठा घुसखोरीचा प्रयत्न होता, जो सुरक्षा दलांनी हाणून पाडला आहे, असे काश्मीरचे अतिरिक्त पोलीस महासंचालक विजय कुमार यांनी दिली आहे.

मारले गेलेले सर्व दहशतवादी कुपवाड्यातील नियंत्रण रेषेवरून घुसखोरीचा प्रयत्न करत होते. जम्मू-काश्मीरचे अतिरिक्त महासंचालक विजय कुमार यांनी सांगितले की, ‘कुपवाडा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनंतर लष्कर आणि पोलिसांच्या पथकांनी नियंत्रण रेषेवर कारवाई केली. या चकमकीत 5 विदेशी दहशतवादी मारले गेले आहेत. सध्या परिसरात शोधमोहीम राबविण्यात येत आहे.” याआधी मंगळवारीही कुपवाडा येथील डोबनार माछिल भागात नियंत्रण रेषेजवळ झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन अज्ञात दहशतवाद्यांना ठार केले होते.

लष्कराने गुरुवारी (15 जून) जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला आणि नियंत्रण रेषेजवळून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त केला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, कृष्णा घाटी सेक्टरमध्ये शोध मोहिमेदरम्यान ही जप्ती करण्यात आली असून त्यात स्टील कोर काडतुसे आणि पाकिस्तानमध्ये बनवलेल्या औषधांचाही समावेश आहे.