शत्रूची झोप उडवणारं घातक ड्रोन खरेदी करणार भारत; अमेरिकेसोबतच्या करारासाठीसंरक्षण अधिग्रहण परिषदे कडून प्रस्ताव मंजूर

संरक्षण अधिग्रहण परिषदेनं गुरुवारी (15 जून) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढील आठवड्यात सुरू होणाऱ्या अमेरिका दौऱ्यापूर्वी अमेरिकन कंपनी जनरल अॅटोमिक्सकडून प्रीडेटर MQ-9B रीपर ड्रोन खरेदी करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. भारत अमेरिकेकडून असं तब्बल 30 ड्रोन खरेदी करणार आहे. भारतीय नौदलाकडे हे दोन ड्रोन आधीच भाड्यानं आहेत. MQ-9B रीपर हे जगातील सर्वात घातक ड्रोन मानलं जातं.

भारताच्या तिन्ही सशस्त्र दलांसाठी ‘सी गार्डियन’ प्रकार खरेदी करण्यात आला आहे.MQ-9B रीपर्स ड्रोनचे दोन प्रकार आहेत, जे स्काय गार्डियन आणि सी गार्डियन म्हणून ओळखले जातात. केवळ सर्विलियन्स नाही तर अटॅक करण्यासाठीही या ड्रोनचा वापर करता येतो. एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल 35 तास हे ड्रोन वापरता येऊ शकतं. सॅटेलाईटनं ऑपरेट करता येणारं हे ड्रोन 45 हजार फूट उंच उडू शकतं. हे ड्रोन सागरी देखरेखीसाठी वापरले जाऊ शकतात, तसेच पाणबुडीविरोधी युद्धासह विविध भूमिका बजावू शकतात. डीएसीच्या बैठकीत ड्रोन खरेदीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.

भारत-चीन सीमेवर सैनिकांमध्ये कायमच चकमक सुरु असते. याच पार्श्वभूमीवर शत्रूला धडकी भरवण्यासाठी भारत हे ड्रोन खरेदी करणार आहे. या ड्रोनच्या माध्यमातून शत्रूच्या सीमेवर शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनची आवश्यकता होती. त्यासाठी MQ-9B प्रीडेटर ड्रोन खरेदी केले जाणार आहेत. या ड्रोनचा करार हा तीन अब्ज डॉलर्सचा असून करारास भारतीय संरक्षण खात्याने मंजूरी दिली आहे.

अमेरिकेकडून ड्रोन खरेदी करण्याची इच्छा भारत पूर्वीपासूनच दाखवत आला आहे. मात्र, काही अडचणींमुळे ही ड्रोन डील लांबत गेली आहे. आता पंतप्रधान मोदी वॉशिंग्टन दौऱ्यावर जाणारच आहेत, तर त्यापूर्वी ही डील फायनल व्हावी यासाठी अमेरिकेचं परराष्ट्र खातं, पेंटागॉन आणि बायडेन सरकार हे मिळून प्रयत्न करत आहेत. अशातच पंतप्रधान मोदी 22 जून रोजी अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. त्यामुळे आता मोदींच्या दौऱ्यावेळीच ड्रोन डील होण्याची शक्यता आहे.