“अजित पवार कार्यक्षम नेते असून त्यांनी आमच्यासोबत यावं,” अशी खुली ऑफर राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर दिली आहे. तसंच राष्ट्रवादीत त्यांच्याबाबत काय होतंय हे सर्वांना माहित असल्याचंही ते म्हणाले. दीपक केसरकर हे निस्सीम साईभक्त असून वर्षभरात अनेक वेळा साईंच्या दर्शनाला हजेरी लावतात. आज सकाळी केसरकर यांनी साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी दीपक केसरकर यांनी संजय राऊत यांच्यासह आदित्य ठाकरे यांच्यावरही टीका केली आहे.
अजित पवार यांच्याबद्दल मला अतिशय आदर आहे. दादा विरोधी पक्षाचे नेते आहेत. ते जबाबदार नेते आहेत. त्यांनी बेजबाबदार विधाने करू नयेत. संजय राऊतांसारखे लोक रोज बोलत असतात. त्यांच्या बोलण्याकडे कुणीही लक्ष देत नाही. मात्र, अजितदादा जेव्हा बोलतात नागरिक त्याला गांभीर्याने घेतात. सामाजिक ऐक्य राखण्याच्या कामात दादा आमच्याबरोबर आघाडीवर असतील याची मला खात्री आहे असे स्पष्ट करत दादांनी सुद्धा सरकारमध्ये यावे. अजित पवार यांच्या कार्यक्षमतेसाठी मोदी सरकार हेच माध्यम आहे, असे वक्तव्य शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केले.
केसरकर आज शिर्डीत आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. केंद्रात आमच्या गटालाही मंत्रिपदे मिळतील याची खात्री आहे. तेथे काही खाती रिक्त आहेत. कोणाला कोणते खाते मिळतील याचा निर्णय पंतप्रधान मोदी घेतील. दादांनी पण सरकारमध्ये यावे ही आमची अपेक्षा आहे. दादा हे कार्यक्षम नेते आहेत. त्यांच्या कामाचा फायदा हा राज्यातील जनतेला झाला पाहिजे. राष्ट्रवादीमध्ये त्यांच्यासोबत काय होतंय हे सर्वांना माहित आहे.
आपल्याच माणसाला धमकी द्यायला लावतात. ही कशी लोक आहेत, यांचे बुरखे आपोआप फाटले जात आहेत. ते किती घाणेरड बोलतात हे आपण समजून घेतलं पाहिजे.त्यांच्या पक्षाने नवीन काहीतरी चॅनल सुरु केलं आहे. त्यात राऊतांना घेतलं नाही. सुषमा अंधारे यांना घेतलं आहे. त्या बाळासाहेबांबद्दल काय बोलल्या अन् त्यांना प्रवक्ता केलं.आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे आहोत. त्यांनी ते विचार सोडले, अशा शब्दात केसरकर यांनी संजय राऊत आणि ठाकरे गटावर हल्लाबोल केला.
