बारामतीला अडलेले पाणी मराठवाड्यापर्यंत पोहोचविणार, उपमुख्यमंत्र्यांची ग्वाही

मराठवाड्याच्या हिश्शाचे पाणी बारामतीला अडले होते. ते पाणी आता मराठवाड्यापर्यंत पाेहाेचविण्याच काम आपलं सरकार तुमच्या आशीर्वादाने करते आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीतुळजापूर येथे उपसा सिंचन योजनेच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, मराठवाड्याच्या विषयाच्या पाण्याची चर्चा अनेक वर्ष होती. त्यासाठी अनेक संघर्ष झाले.

2014 साली मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली त्यावेळी त्यावेळी कृष्णा मराठवाडा प्रकल्पाच्या सर्व अडचणी आपण दूर केल्या. त्याला मान्यता देऊन कामाला सुरुवात केली. त्याला पुन्हा सुधारित प्रशासकीय मान्यतेची आवश्यकता होती. परंतु अडीच वर्ष जे सरकार महाराष्ट्रात होते त्यांनी सुधारित प्रशासकीय मान्यतेचा एक शब्द देखील लिहिला नाही. त्याला कुठलीही मान्यता दिली नाही. त्यामुळे या कामावर एक मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. तुमच्या आशीर्वादाने पुन्हा आपले सरकार आले. माझ्याकडे या विभागाची जबाबदारी आली. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली याच कृष्ण मराठवाडा प्रकल्पाला आम्ही पहिली अकरा हजार पाचशे कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता दिली.

धाराशिव जिल्ह्यातील 24000 हेक्टरला आपण पाणी देणार आहोत. मराठवाड्याच्या हिश्याचे जे पाणी बारामतीला अडले होते ते मराठवाड्यापर्यंत पोहोचण्याचे काम आपले सरकार करत आहे. फडणवीस म्हणाले, आई तुळजाभवानी ही शक्तीची देवता आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे, तशीच आमच्या परिवाराची कुलदेवी आहे. आम्ही आशीर्वाद मागितला आहे की या राज्यातील गोरगरीब दिन दुबळ्या शेतकरी महिला या सर्वांच्या जीवनात सामाजिक आर्थिक परिवर्तन करण्याची ताकद आम्हाला दे. तहानलेल्या मराठवाड्याला पाणी देण्याचे काम आपण करू. सांगली कोल्हापूरला वेढा घालणारे पुराचे पाणी डायव्हरजन कॅनलच्या माध्यमातून उजनीमध्ये आणून मराठवाड्याला कसे देता येईल यासंदर्भातील प्रस्ताव जागतिक बँकेकडे दिलेला आहे. त्यांनी त्याबाबत विचारही सुरू केला आहे. समुद्रात वाहून जाणारे पाणीही वेगवेगळ्या लिफ्टच्या माध्यमातून गोदावरीच्या खोऱ्यात आणण्याचे काम आपण करणार आहोत. 2018 -19 मध्ये या संदर्भातील सर्व संकल्पना आपण पूर्ण केली. पण दुर्दैवाने पुढे काम होऊ शकले नाही.

सरकार आल्यावर पुन्हा त्याला गती दिली. दुष्काळाच्या विरोधातील आपली लढाई जिंकण्या करता आपण वेगवेगळे कार्यक्रम हाती घेतले आहेत. त्यासाठी कृष्णा मराठवाडा हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. शिवाजी महाराज लढाईवर जाण्यापूर्वी जसे शस्त्र पूजन करायचे तसे या प्रकल्पाचे आपण यंत्र पूजन केले आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले.