काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलाच्या हालचालींना वेग; प्रदेशाध्यक्षपदासाठी चव्हाण-पटोलेंमध्ये रस्सीखेच?

आगामी लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. काँग्रेसनेही जागांची चाचपणी करायला सुरुवात केली. तर दुसरीकडे मात्र काँग्रेसपक्ष अंतर्गत खांद्येपालट सुरूच आहे.मुंबई अध्यक्ष बदलल्यानंतर आता प्रभारी बदलण्याची हालचाल सुरू आहे. त्याचं सोबत प्रदेश अध्यक्ष पद टिकवण्यासाठी आणि बदलण्यासाठी दोन्हीही बाजूने जोरदार हालचाली सुरू आहे आणि त्यासाठी पुन्हा एकदा नेत्यांच्या दिल्लीवारी सुरू झालेल्या आहेत.

प्रदेशाध्यक्षपदासाठी अशोक चव्हाणांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत, तर प्रदेशाध्यक्षपदी कायम राहण्यासाठी पटोलेंची धावपळ सुरू आहे, अशी चर्चा दिल्लीसोबतच राज्यातही सुरू आहे. अंतिम निर्णय काँग्रेसचे नेते राहुल गांधीच घेतील, यामुळे प्रदेशाध्यक्षपद पटोले टिकवणार की अशोक चव्हाणबाजी मारणार याची चर्चा सुरू आहे.

नाना पटोले हे दोन दिवस दिल्लीमध्ये होते . नुकतीच अशोक चव्हाण यांचीही दिल्लीवारी झाली होती. दोन दिवसीय दौऱ्यात चव्हाण यांनी काँग्रेसच्या अनेक वरिष्ठ नेत्यांची गाठीभेटी घेतल्याचे वृत्त आहे. यानंतर लगोलग नाना पटोलेदेखील दिल्लीत दाखल झाले. त्यामुळे कुठेतरी प्रदेशाध्यपदी कायम राहण्यासाठी पटोले प्रयत्न करत आहेत का? अशी चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे चव्हाण आणि पटोले यांचे समर्थकही दिल्लीत दाखल झाले होते. काहींनी नाराजीचा तर काहींनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सूर आवळला होता.

तसे पाहिले तर राज्यातील काही नेते नाना पटोले यांच्यावर नाराज आहेत. या नेत्यांनी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेत नाराजी बोलून दाखवली होती. त्यानंतर अशोक चव्हाण देखील दिल्लीला गेले होते. चव्हाण दोन दिवस दिल्लीत होते. येथे त्यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. त्यानंतर पटोलेंचे समर्थक देखील दिल्लीत जाऊन आले. आता पटोले स्वतःच दिल्लीत गेले आहेत.

नाना पटोले एकला चलोच्या भूमिकेत आहेत म्हणून महाराष्ट्रातील काही नेते नानांच्या विरोधामध्ये आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, केसी वेणुगोपाल आणि प्रभारी एचके पाटील यांच्याशीफार सौख्य नाही. नाना पटोले यांचा आक्रमक आणि एकला चलो रे स्वभावामुळे महाविकास आघाडीतील नेतेही फार चांगले संबंध नाही. ही जरी नाना पटोले यांची कमकुवत बाजू असली तरी राहुल गांधीच्या नजरेत नाना पटोले यांची इमेज अद्याप वेगळी पाहायला मिळते. प्रदेशाध्यक्षपद मिळविण्यासाठी अशोक चव्हाण यांच्या वारंवारहोणाऱ्या दिल्लीवारी पाहायला मिळते. मात्र यावर अंतीम निर्णय आता राहूल गांधी घेणार असल्याचीमाहिती समोर येतेय.