ज्यांच्या जागा अधिक त्यांचा विरोधी पक्षनेता, विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर अजित पवारांचा दावा

विधानपरिषदेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे ठाकरे गटाच्या अडचणी वाढू शकतात. ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांचं विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेतेपद धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यानंतर विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर राष्ट्रवादी काँग्रेस दावा करणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. ठाकरे गटाच्या विधानपरिषदेतील जागांची संख्या कमी होत असल्याने अडचण वाढण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या एका विधानाने याचे संकेत मिळालेत. विधान परिषदेत ज्यांच्याकडे संख्याबळ, त्यांचाच विरोधी पक्षनेता होणार असल्याचा दावा अजित पवारांनी केला आहे. त्यांच्या या विधानामुळे महाविकास आघाडीत कुरबुरी वाढण्याची शक्यता आहे. २०१४मध्ये विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी सांगितलं ज्या पक्षाचे सर्वात जास्त सदस्य त्यांचा आमदार मी विरोधी पक्षनेता म्हणून जाहीर करणार. तुम्ही सांगताय त्याबद्दल आम्ही कोणताही विचार केलेला नाही. परंतु तुम्ही हे लक्षात आणून दिल्यामुळे आम्ही निश्चितपणे यावर विचार करू. अस अजित पवार यांनी प्रसार माध्यमांना सांगितलं.

आधी विप्लव बजौरिया आणि मग मनिषा कायंदे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जागा कमी झाल्या आहेत. ठाकरे गटाच्या आमदारांची संख्या 9 झाली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची संख्या देखील 9 आहे. सध्या ठाकरे गटाचे अंबादास दानवे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत. जर राष्ट्रवादीने दावा केला तर त्यांचं पद जाऊ शकतं. एकीकडे अजित पवार हे विधासभेचे विरोधी पक्षनेते आहेत, म्हणजेच हे पद राष्ट्रवादीकडे आहे, त्यात आता विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर राष्ट्रवादीने दावा केला तर ठाकरे गटाच्या अडचणी वाढू शकतात.

बीआरएस महाराष्ट्रात प्रयत्न करतायत. कोणत्याही पक्षाला आपल्या पक्षाची वाढ करण्याचा अधिकार आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी एकत्र लढणार आणि भाजप आणि एकनाथ शिंदे एकत्र लढणार असं चित्र आहे. त्यामुळे अनेकांना आपल्याला उमेदवारी मिळणार नाही असं वाटतय त्यामुळे अनेकजण बीआरएसमध्ये जात आहेत. बीआरएसच्या जाहिरातीसाठी पैसा कुठुन येतोय, असा सवालही अजित पवारांनी उपस्थित केला आहे.