उद्धव ठाकरेच महाराष्ट्रातले खरे गद्दार; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

कल्याणमध्ये भाजपच्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो. एकनाथ शिंदे यांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो. मुंबईत वर्धापन दिनाचे दोन कार्यक्रम सुरू आहे. एक कार्यक्रम ज्यांनी शिवसेना वाचवली त्यांच्या नेतृत्वात सुरू आहे. तर दुसरा कार्यक्रम बाळासाहेबांचे विचार बुडवले त्यांच्या नेतृत्वात सुरू आहे. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे एकदा म्हणाले, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याची वेळ येईल तेव्हा शिवसेनेचे दुकान बंद करेन. पण, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणार नाही.

परंतु, उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची बोलवत होती. भाजप-शिवसेनेच्या युतीला जनतेने पू्र्ण बहुमत दिले. त्यावेळी हिंदुत्वाकरिता मतं मागितली होती. पण, निवडणूक झाली आणि उद्धव ठाकरे यांची नियत बदलली. खुर्चीकरिता विचारांशी गद्दारी ही उद्धव ठाकरे यांनी केली. भाजपच्या मतांवर निवडून आले. मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेससोबत गेले. खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात गद्दारी कुणी केली असेल तर उद्धव ठाकरे ती गद्दारी तुम्ही केली, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला.

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी शिवसेना जोपासण्याचं काम केलं. त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत नाही तर, भाजपसोबत मत मागितली होती. म्हणून ते आमच्यासोबत आले, असंही फडणवीस म्हणाले. मोगलांना जसे संताजी धनाजी दिसायचे तसे आता मोदीजी आणि अमित शहांचे नाव घेतलं. तर हीच अवस्था उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीची झाली. असा टोलाही फडणवीसांनी लगावला आहे.

“उद्धव ठाकरेंनी जे भाषण केलं ते काही भाषण होतं का? त्याला भाषण म्हणायचं का? ती ओकारी होती. मी असे शब्द वापरत नाही पण मला वापरण्यासाठी तेच मजबूर करत आहेत. यांची अवस्था अशी आहे की त्यांना जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी मोदीजी आणि अमित शाहच दिसत आहेत.” असं म्हणत उद्धव ठाकरेंवर देवेंद्र फडणवीसांनी घणाघाती टीका केली आहे.