भाजप विरोधात देशातील विरोधी पक्षांची पाटणात आज बैठक, देशातील बडे नेते उपस्थित राहणार

देशात 2024 मधील लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बिहारची राजधानी पाटणा येथे आज विरोधी पक्षांच्या ऐक्याबाबत महत्त्वाची बैठक होत आहे. विरोधी पक्षांच्या या बैठकीत एकूण 17 पक्ष सहभागी होणार होते, परंतु समाजवादी पक्षाचा सहयोगी राष्ट्रीय लोक दल सामील होणार नाही. त्यामागे पक्षप्रमुख जयंत चौधरी हे देशाबाहेर असल्याचे कारण सांगितले जात आहे. जयंत चौधरी लंडनमध्ये असून पक्षप्रमुखांनी बैठकीला हजेरी लावणे अपेक्षित आहे, त्यामुळे या बैठकीत आरएलडीचा एकही प्रतिनिधी नसणार आहे.

मुख्यमंत्री निवासस्थानी होणाऱ्या या बैठकीला जनता दल युनायटेडचे नितीश कुमार, राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी उपस्थित राहणार आहेत. समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव, नॅशनल कॉन्फरन्सचे फारूख अब्दुल्ला, पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या मेहबुबा मुफ्ती, शिवसेनेचे (यूबीटी) उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी, आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

विरोधकांच्या या महामंथनात 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सर्व पक्ष एकाच व्यासपीठावर कसे येतील? यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. सर्व पक्षांनी एकत्र आल्यास भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए) पराभव होऊ शकतो, असा दावा विरोधी पक्षांचे नेते वारंवार करत आहेत.

विरोधकांची ही बैठक महत्वाची का?

विरोधकांच्या बैठकीसाठी पाटणा ही अनेक अर्थाने महत्त्वाची जागा आहे. ममता बॅनर्जींना यासाठी नितीश कुमार यांना जय प्रकाश नारायण यांच्या ‘संपूर्ण क्रांति आंदोलना’चा दाखला दिला होता.इंदिरा गांधी सरकारविरोधात 1975 साली जयप्रकाश नारायण यांच्यासोबत जवळपास सर्वच विरोधी पक्ष एकजुटीने उभे राहिले होते. त्या काळात पाटणा विद्यार्थी आंदोलनापासून सुरू झालेल्या राजकीय विरोधाचं केंद्र बनलं होतं.

याच आंदोलनाने नंतर बिहारसह संपूर्ण देशाच्या राजकारणात नेतृत्वाची नवीन फळी समोर आणली. यामध्ये बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव आणि सध्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचाही समावेश आहे.इतर काही कारणांमुळेही पाटणा विरोधकांच्या बैठकीसाठी महत्त्वाची जागा आहे. 2015 साली इथूनच नितीश कुमारांनी भाजपविरोधात विरोधी पक्षांना एकत्र आणत महाआघाडी उभी केली होती. त्यावर्षी बिहारमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत या महाआघाडीने भाजपला चांगलीच मात दिली होती.