टायटन पाणबुडीतील सर्व प्रवाशांचा मृत्यू; टायटॅनिकच्या अवशेषाखाली 1600 फूट खाली मलबा सापडला

बेपत्ता टायटन पाणबुडीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. बेपत्ता टायटन पाणबुडीतील पाचही प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं जहाज ऑपरेट करणाऱ्या कंपनीने म्हटलं आहे. टायटन पाणबुडीतील पाचही जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याला दुजोरा देत पाणबुडी चालवणारी कंपनी ओशियन गेट ने श्रद्धांजली वाहिली आहे. पाणबुडीतील सर्व लोक बुडालेल्या टायटॅनिक जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी खोल समुद्रात गेले होते, मात्र तिथे त्यांचा संपर्क तुटला. 18 जून रोजी ओशियन गेट कंपनीची ही पाणबुडी प्रवासाला निघाली होती, मात्र पहिल्या 2 तासातच संपर्क तुटला होता.

यूएस कोस्ट गार्डचे आर अॅडमिरल जॉन माउगर म्हणाले – अटलांटिक महासागरात टायटॅनिकच्या अवशेषाच्या खाली 1600 फूट खाली पाणबुडीचा मलबा सापडला आहे. रिमोटवर चालणाऱ्या वाहनातून हे शोधण्यात आले. पाणबुडीत स्फोट झाला असण्याची शक्यता आहे.हा स्फोट कधी झाला हे सांगणे घाईचे ठरेल त्यांनी सांगितले. याबाबत अजूनही अनेक प्रश्न आहेत, ज्यांची उत्तरे शोधावी लागणार आहेत. रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय वेळेनुसार रविवारी संध्याकाळी साडेपाच वाजता ही पाणबुडी अटलांटिक महासागरात सोडण्यात आली. तासाभरानंतर ती बेपत्ता झाली. चार दिवसांपासून शोधमोहीम सुरू होती, ती आता मागे घेण्यात आली आहे.

कॅनडाच्या एका जहाजाशी जोडल्या गेलेल्या एका यंत्रमानवी उपकरणाच्या मदतीनं पाणबुडीच्या अपघातग्रस्त अवशेषांचा शोध सालण्यात आला. गुरुवारीच यासंदर्भातील माहिती समोर आली. समुद्रतळाशी साधारण 1600 फूट (488 मीटर) खोलवर टायटॅनिक जहाजाच्या एका टोकापासूनच काही अंतरावर अटलांटिक महासागराच्या उत्तरेला असणाऱ्या एका कोपऱ्यात या पाणबुडीचे अवशेष सापडले. पाणबुडीचे पाच भाग या शोधमोहिमेत सापडल्याची अधिकृत माहिती सध्या मिळत असून, त्यामध्ये या 22 फूटांच्या पाणबुडीचे दोन तुकडे झाल्याचं सांगण्यात येत आहे. शिवाय यामध्ये प्रवास करणाऱ्या कोणत्याही प्रवाशासंदर्भातील माहिती किंवा अवशेष मात्र सापडू शकलेले नाहीत. दरम्यान, पाणबुडी आदळल्यामुळं ही दुर्घटना ओढावल्याची माहिती संबंधित शोधपथकाशी संबंधित अधिकारी देत आहेत.