बिहारची राजधानी पाटणात काल विरोधी पक्षांची बैठक पार पडली. या बैठकीत देशभरातील १५ पक्षांचे प्रमुख नेते सहभागी झाले होते. या बैठकीसाठी महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेने ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरेही सहभागी झाले होते. यावरुनच आता भाजप आणि शिंदे गटाने उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री असताना फक्त दोन वेळा मंत्रालयात गेलेले काल सत्तेच्या लालसेने थेट पाटण्याला पोहोचले. सत्तेसाठी आधीच हिंदुत्व खुंटीला टांगले होते, काल पाटणा इथं जाऊन ते वेशीवर टांगले. केवळ आणि केवळ मोदींना विरोध करण्यासाठी एकत्र आलेल्या लोकांची आघाडी होणार नाही आणि झाली तरी या स्वार्थी आघाडीला लोक स्वीकारणार नाहीत असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
ट्वीट करत एकनाथ शिंदे म्हणाले, “मुख्यमंत्री असताना फक्त दोन वेळा मंत्रालयात गेलेले काल सत्तेच्या लालसेने थेट पाटण्याला पोहोचले. सत्तेसाठी आधीच हिंदुत्व खुंटीला टांगले होते, काल पाटणा येथे जाऊन ते वेशीवर टांगले. केवळ आणि केवळ मोदींना विरोध करण्यासाठी एकत्र आलेल्या लोकांची आघाडी होणार नाही. झाली तरी या स्वार्थी आघाडीला लोक स्वीकारणार नाहीत.”
सत्तेसाठी शिवसेना पक्ष, बाळासाहेबांचे विचार गहाण ठेवणाऱ्या अशांच्या विरोधात आम्ही एक वर्षापूर्वी उठाव केला. कालच्या बैठकीमुळे आमची भूमिका किती योग्य होती हेच पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. बाळासाहेबांनी ज्या काँग्रेस, राजद, पीडीपी, राष्ट्रवादी काँग्रेस, जेडीयू यांच्यावर कायम सडकून टीका केली होती, त्याच लोकांच्या टोळीत हे सामील झाले आहेत. याच लोकांनी हिंदुत्वाला, राम मंदिर उभारणीला आणि कलम ३७० रद्द करण्याला कडाडून विरोध केला होता, हे विसरून त्यांचेच उंबरे हे झिजवत आहेत. ३७० कलमाचे समर्थन करणाऱ्या मेहबुबा मुफ्ती यांच्या शेजारी बसून एकोप्याच्या गप्पा करत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा द्वेष हा या सर्व विरोधकांचा एक कलमी कार्यक्रम आहे. हिंमत असेल तर त्यांनी आघाडीचा नेता जाहीर करावा. पण तसे होणार नाही. कारण प्रत्येकजण पंतप्रधान होण्याची स्वप्न पाहात आहे.
बाळासाहेबांनी ज्या काँग्रेस, राजद, पीडीपी, राष्ट्रवादी काँग्रेस, जेडीयू यांच्यावर कायम सडकून टीका केली होती, त्याच लोकांच्या टोळीत हे (उद्धव ठाकरे) सामील झाले आहेत. याच लोकांनी हिंदुत्वाला, राम मंदिर उभारणीला आणि कलम ३७० रद्द करण्याला कडाडून विरोध केला होता, हे विसरून त्यांचेच उंबरे हे झिजवत आहेत. ३७० कलमाचे समर्थन करणाऱ्या मेहबुबा मुफ्ती यांच्या शेजारी बसून एकोप्याच्या गप्पा करत आहेत, असे शिंदे म्हणाले.
