ताई, तू लढत राहा, आम्ही सगळे तुझ्या सोबत, दिव्यांग भगिनीच्या ऊर्जेने भारावले देवेंद्र फडणवीस

जळगाव दोऱ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिव्यांग बांधवांसाठी कार्यरत असलेल्या दीपस्तंभ फाऊंडेशनच्या ‘मनोबल’ येथे भेट दिली. यावेळी दिव्यांग भगिनीच्या ऊर्जेने उपमुख्यमंत्री भारावून गेले.

आपल्या भावना व्यक्त करताना फडणवीस म्हणाले, आजवर कितीतरी माता-भगिनींनी मला ओवाळलं. कपाळावर आशीर्वादाचा गंध लावला. आजही त्याच भावनेनं अंगठा कपाळाला टेकला पण तो पायाचा… हाताचा नव्हे. आयुष्यात असे हे क्षण येतात आणि आतून-बाहेरून मन थरारतं. अंगावर रोमांच उभे राहतात. डोळ्यांच्या कडा ओलावतात पण क्षणभरच. कारण पायाच्या अंगठ्यानं टिळा लावणाऱ्या, त्याचं पायानं आरतीचं तबक ओवाळणाऱ्या, त्या दिव्यांग भगिनीच्या चेहऱ्यावर हास्य फुललेलं होतं. तिच्या नजरेतली चमक आणि धमक जणू नियतीला आव्हान देत म्हणत होती की “तू काय मला हरवणार? मला कोणाची सहानुभूती नको, दया नको. मी खंबीर आहे.

भावनाविवश झालेले फडणवीस म्हणाले, ताई, तू लढत राहा, आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत.” या भगिनीकडून ऊर्जा आणि प्रेरणा घेताना कुसुमाग्रज आठवले -“अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा किनारा तुला पामराला!”