समाजातील प्रत्येक घटकाला सुखी, समृद्ध कर; मुख्यमंत्र्यांचं विठ्ठलाच्या चरणी साकडं

आज आषाढी वारीनिमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्निक विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न झाली. यावेळी बळीराजा कष्टकऱ्याला चांगले दिवस यावेत. राज्यातील बळीराजा सुखी समाधानी व्हावा. पाऊस पडू दे, प्रत्येक राज्यातल्या माणसाला चांगले दिवस यावेत हे साकडं मुख्यमंत्र्यांनी विठुरायाच्या चरणी घातलं. सलग दुसऱ्या वर्षी विठ्ठल रुक्मिणीच्या शासकीय पुजेचा मान मला मिळाला, त्यामुळं मी स्वता:ला भाग्यवान समजतो असेही मुख्यमंत्री म्हणाले.

पुढे बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मला पत्रकारांनी विचारला, की तुम्ही विठुरायाला काय मागितलं. आता विठुरायाकडे काय मागणार, बळीराजाला चांगले दिवस येऊदेत, शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना चांगले दिवस येऊदेत. राज्यात पाऊस चांगला पडू दे. हे राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे. राज्यातील सर्व घटक सुखी समाधानी झाले पाहिजे. त्यांच्या जीवनात चांगले दिवस आले पाहिजेत हाच आपला उद्देश आहे. असे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

“मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. माझ्या हातून जेवढं सर्वसामान्य लोकांचं काम होईल, राज्याच्या विकासाचं काम होईल हाच माझा आणि आमच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा प्रयत्न आहे. विरोधकांकडे विरोध आणि आरोप याशिवाय दुसरं काहीच नाहीये. आरोप आणि टोमणे. त्यामुळे त्यांच्याकडे आम्ही लक्ष देत नाही. त्यांच्या आरोपांना एकनाथ शिंदे कामातून उत्तर देईल. महाराष्ट्रातली जनता सूज्ञ आहे. काम करणारे लोक कोण आहेत, हे महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे”, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी विरोधकांच्या टीकेला खोचक प्रत्युत्तर दिलं.

मंदिर परिसर विकास आराखड्यासाठी 73 कोटीचा निधी उपलब्ध करून दिला आहे. पंढरपूर शहर विकास आराखडा सर्वांना विश्वासात घेऊन तयार करण्यात येईल. तसेच, 30 खाटांचे रूपांतर 100 खाटांमध्ये लवकरच करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. सलग दोन वर्षे आपल्याला आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेचा मान मिळणे हे आपले भाग्य असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.