लढाण्यात एका प्रवासी बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. यामध्ये 25 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. बसमध्ये एकूण 33 प्रवासी होते. यातील आठ प्रवासी सुखरुप बाहेर पडले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावालगत समृध्दी महामार्गावर हा अपघात झाला आहे. ही प्रवासी बस नागपूरहून पुण्याला निघाली होती. त्यावेळी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही भीषण घटना घडली.
ही खासगी बस नागपूरहून पुण्याला जात होती. रात्री 1 ते दीडच्या सुमारास हा अपघात झाला. मध्यरात्री समुद्धी महामार्गावरील सिंदखेड राजा जवळील पिंपळखुटा गावात अचानक बस पलटी झाली. त्यानंतर बसला आग लागली आणि बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केलं. बस पलटी झाल्याने प्रवाशांना बसमधून बाहेर पडता येत नव्हतं. बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग उरला नव्हता. अनेक प्रवासी बाहेर पडण्यासाठी धडपडत होते. किंचाळ्या, आक्रोश सुरू होता, पण त्यांना बाहेर पडता येत नव्हतं. आग मोठी असल्याने इतरांनाही त्यांना बाहेर काढणं शक्य नव्हतं. त्यामुळे या बसमधील 25 प्रवाशांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. तर चालकासह चारजण या अपघातातून बचावले आहेत. या बसमधून 33 प्रवाशी प्रवास करत होते.
बुलढाण्याजवळीच सिंदखेडराजा परिसरात चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट डिव्हायरला धडकली आणि रस्त्यावरच उलटली. हा अपघात इतका भीषण होता की, क्षणार्धात बसच्या डिझेल टाकीने पेट घेतला.घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावरील अपघातांच्या घटनेत मोठी वाढ झाली आहे. दररोज किरकोळ तसेच गंभीर स्वरूपाचे अपघात होत आहे. परिवहन विभागाकडून अपघात रोखण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहे. मात्र, अद्यापही अपघातांचे प्रमाण कमी झाले नाही.
अपघातानंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर बसमधील डिझेल सांडले आहे. त्यामुळं एक तर डिझेल टॅंक फुटली असावी किंवा डिझेल टॅंक मधून इंजनकडे सप्लाय होणारा पाईप फुटला असावा, त्यामुळेचं बसने पेट घेतला असल्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. जे लोक बचावले आहे त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे जे लोक काचेची खिडकी हाताने फोडून बाहेर निघू शकले त्यांचा जीव वाचला आहे. बसमधून 25 मृतदेह पोलिसांनी बाहेर काढले आहेत. जे मृतदेह बसमधून बाहेर काढण्यात आले आहेत, त्यांची ओळख पटवणे अडचणीचे होत आहे.
