प्रवासी बस अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून पाच लाखांची मदत जाहीर

बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण बस अपघातात २५ प्रवाशांचा बसला लागलेल्या आगीत होरपळून मृत्यू झाला. ही बस नागपूरहून पुण्याच्या दिशेने चालली होती. त्यावेळी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळ हा अपघात झाला. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली.एकनाथ शिंदे म्हणाले, “झालेली घटना अतीशय दुर्दैवी व दुःखद आहे. विदर्भ एक्स्प्रेस ही खासगी बस नागपूरहून निघाली होती. मी पोलीस महासंचालक आणि पोलीस अधीक्षकांशी बोललो आहे. यात दुर्दैवाने २५ लोकांचा जागीच मृत्यू झाला आहे. जे सुखरूप आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.”

या अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. या अपघाताच्या घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. तर अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांच्या उपचाराचा सर्व खर्च सरकार करणार असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे.अपघातग्रस्त बस ही नागपूरहून पुण्याकडे जात होती. त्यावेळी हा अपघात घडला. या बसमध्ये नागपूर, वर्धा, आणि यवतमाळचे या ठिकाणचे प्रवासी होते. ही बस विदर्भ ट्रॅव्हल्सची होती. ही बस सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावालगत समृध्दी महामार्गावर रस्ता दुभाजकाला धडकली आणि त्यानंतर बसने पेट घेतला.

“अपघात कशामुळे झाला, नेमकं काय घडलं, याची चौकशी तर होईलच. मात्र, मी जखमींवर तातडीने उपचार करण्याच्याही सूचना दिल्या आहेत. तशाप्रकारे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. प्रवाशांची ओळख पटवण्याच्याही सूचना दिल्या आहेत.