14 व्या वित्त आयोगाच्या निधीअंतर्गत ग्रामपंचायतींना विद्युत घंटागाड्यांचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते वितरण

अहमदनगरमध्ये 14 व्या वित्त आयोगाच्या निधीअंतर्गत स्वचछ भारत अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामपंचायतींना कचरा संकलनासाठी व वाहतुकीसाठी तीन चाकी विद्युत घंटागाड्यांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.

पालकमंत्री श्री.विखे-पाटील म्हणाले की, ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणाबरोबरच गावांच्या सर्वांगिण विकासावर शासनाचा भर देण्‍याचा प्रयत्‍न आहे. ग्रामीण भागातील जनतेला स्‍वच्‍छ पिण्याचे पाणी मिळावे यासाठी जलजीवन मिशन योजना राबविण्यात येत आहे. जलजीवन मिशन योजनेंतर्गत आपल्या जिल्ह्यासाठी ४ हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून या निधीतून पिण्‍यासाठी स्‍वच्‍छ पाणी पुरवठ्याची कामे करण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

गावाचा विकास साधण्यासाठी सरपंचांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढीसाठी विविध उपक्रम राबविण्यात यावेत. राज्यातील प्रत्येक बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे यासाठी रोजगार निर्मितीवर शासन भर देत आहे. जिल्हा परिषदेमार्फत वितरित करण्यात आलेल्या विद्युत घंटागाड्या आपल्या अहमदनगर येथील एमआयडीसीतील उद्योग समुहात तयार झाल्या असून ही अत्यंत अभिमानास्पद बाब असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

खासदार डॉ. सुजय विखे-पाटील म्हणाले की, लोकसंख्या वाढीमुळे शहराबरोबरच ग्रामीण भागातही कचऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामीण भागातील कचऱ्याच्या संकलनासाठी विद्युत घंटागाड्यांचा उपक्रम अत्यंत चांगला आहे. विद्युत घंटागाड्या असल्याने पेट्रोल व डिझेलचा खर्च वाचून गावाची स्वछता होणार आहे.

देशात मेक इन इंडिया संकल्‍पनेप्रमाणे विद्युत घंटागाड्यांची अहमदगनरमध्‍ये निर्मिती करण्‍यात आल्‍याने मेक इन अहमदनगर असे म्‍हणायला हरकत नसल्‍याचेही त्‍यांनी यावेळी सांगितले.अशा प्रकाराच्‍या घंटागाड्या जिल्‍ह्यातील सर्व ग्रामपंचातींना उपलब्‍ध करुन देण्‍यासाठी जिल्‍हा नियोजन समितीतुन निधीची तरतुद करण्‍यात येईल. जिल्‍ह्यातील गावे सक्षम करण्‍यासाठी, बचत गटांना स्‍टॉल, जिल्‍हा परिषदेच्‍या शाळेच्‍या खोल्‍या बांधकाम या कामांसाठी मागील वर्षात निधी उपलब्‍ध करुन दिलेला आहे. विद्यमान सरकार हे जनतेच्‍या हिताचे सरकार असल्‍याचे त्‍यांनी यावेळी सांगितले.

14 व्‍या वित्‍त आयोग योजनेअंतर्गत जिल्‍हा परिषदेच्‍या माध्‍यमातुन एकुण 177 विद्युत घंटागाड्या खरेदी करण्‍यात आलेल्‍या आहेत. त्‍यापैकी 75 विद्युत घंटागाड्यांचे पालकमंत्र्यांच्‍या हस्‍ते वितरण करण्‍यात आले. यामध्‍ये राहुरी तालुक्‍यासाठी 10, शेवगांव 8, पाथर्डी 10, जामखेड 4, कर्जत 8, श्रीगोंदा 12, पारनेर 10 तर अहमदनगर तालुक्‍यासाठी 13 घंटागाड्यांचे वितरण करण्‍यात आले.