महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ सुरु असतानाच शिवसेना शिंदे गटाच्या 16 आमदारांविरुद्धच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर लवकरच निर्णय घेणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह इतर आमदारांना नोटीस जाणार दिली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज त्यांना नोटीस देण्याची शक्यता आहे. निलंबित आमदार प्रकरणात पुढे कायदेशीर भूमिका काय याची विचारणा केली जाणार.
त्यानंतर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या आमदारांना आपलं म्हणणं मांडण्यासाठी नोटीस बजावली आहे. ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी सुप्रीम कोर्टात ही याचिका दाखल केली आहे. त्यामुळे आता सुप्रीम कोर्टाने या याचिकेवर आपली भूमिका घेण्याअगोदर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील कामकाजाला वेग दिला आहे. अपात्रतेविरोधातील कारवाई टाळण्यासाठी आमदारांना सर्व पुरावे सादर करावे लागणार आहेत. निवडणूक आयोगाकडून विधीमंडळास शिवसेनेच्या घटनेची प्रत प्राप्त झालेली असून शिवसेनेच्या घटनेचा अभ्यास करून लवकरच निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
दरम्यान, सुप्रीम कोर्टाने 11 मे रोजी एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील असा निर्णय दिला होता. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी (एमव्हीए) सरकार पुनर्संचयित करू शकत नाहीत. कारण शिंदे यांच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने बहुमत चाचणीला सामोरे न जाता राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता, असे सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं. अशातच आता विधानसभेचे पावसाळी अधिवेशन 17 जुलैपासून सुरू होणार आहे. त्यामुळे यासगळ्या गोंधळासंदर्भातील महत्त्वाची निर्णय लवकरच येण्याची शक्यता आहे.
