महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये झालेल्या भूकंपानंतर भाजपने त्यांच्या आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये आमदारांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेमध्ये का घेतलं, याचं कारण आमदारांना सांगितलं.
‘राष्ट्रवादीला सोबत घेण्याचा निर्णय वरिष्ठांचा आहे, तो आपल्याला मान्य करून स्वागत करायला हवं, मोदींना साथ देण्यासाठी सोबत येणाऱ्यांचे स्वागत करा, पक्ष बळकट करण्यासाठी कामाला लागा,’ अशा सूचना देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांना केल्या आहेत.“भाजप पक्ष फोडत नाही” तसेच “मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल”, असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांना दिलं. “पक्ष बळकट करण्यासाठी कामाला लागा. संपर्क से समर्थन अभियान जोमाने राबवा”, अशी सूचना देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांना दिली.
“विरोधी कितीही एक आले तरी त्याने फायदा होणार नाही. भाजपा पक्ष फोडत नाही, पण मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कुणी येत असेल तर त्यांना सोबत घेण्याला विरोध नाही. मोदींना साथ देण्यासाठी सोबत येणाऱ्यांचे स्वागत करा. विस्तार सुद्धा आपण लवकरच करू”, असंही फडणवीस यांनी आमदारांना सांगितलं.
भाजपमध्ये कोणीही नाराज नाही – चंद्रशेखर बावनकुळे
राष्ट्रवादी काँग्रेसला बरोबर घेतल्याने पक्षात निर्माण झालेली नाराजी दूर करण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी पक्षातील आमदार व ज्येष्ठ नेत्यांची शुक्रवारी रात्री बैठक घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदींना साथ देण्यासाठी भाजप बरोबर येणाऱ्यांचे स्वागत करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत आमदारांना केले. तर वरिष्ठांचा निर्णय सर्वाना मान्य असून भाजपमध्ये कोणीही नाराज नसल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना केला.
