पात्र गिरणी कामगारांना तातडीने घरे मिळण्यासाठी अधिकच्या घरकुलांची निर्मिती करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

गिरणी कामगारांची पात्रता निश्चित करून पात्र कामगारांना घरे देण्यासाठी शासनामार्फत जे निर्णय घेणे आवश्यक असेल ते घेतले जातील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. विविध योजनांमधून घरे उपलब्ध होत असून सर्व पात्र गिरणी कामगारांना घरे मिळण्यासाठी अधिकच्या घरकुलांची निर्मिती करणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) आणि गिरणी कामगार सनियंत्रण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बॉम्बे डाईंग आणि श्रीनिवास मिल यामधील 251 पात्र गिरणी कामगारांना घरकुलांच्या चाव्या वाटप करण्यात आल्या.

या कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कामगार मंत्री सुरेश खाडे, गिरणी कामगार समितीचे अध्यक्ष आमदार सुनील राणे, आमदार कालिदास कोळंबकर, प्रकाश आबिटकर, गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर सिंह, ‘म्हाडा’ चे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल, मुख्याधिकारी मिलिंद बोरीकर आदी उपस्थित होते.

एकनाथ शिंदे म्हणाले की, घर हे सर्वांचे स्वप्न असते. मुंबईच्या विकासात गिरणी कामगारांचा सिंहाचा वाटा आहे. पात्र गिरणी कामगारांना घरांच्या चाव्या वाटपाचा 20 दिवसांतील हा दुसरा टप्पा असून कामाची ही गती यापुढेही कायम राहणार आहे. यापुढे देखील घर मिळण्यात विलंब होऊ नये यासाठी गिरणी कामगारांची जशी पात्रता निश्चित होईल तसे चाव्या वाटपाचे कार्यक्रम घेण्यात येतील. कामगारांना गिरण्यांच्या जागेवरच घरे देण्याचा प्रयत्न असून गिरणी कामगारांचे घरांचे स्वप्न पूर्ण होत असल्याने कामगारांना आनंद होत आहे. त्यांच्या आनंदात शासन म्हणून आम्हालाही आनंद असल्याचे त्यांनी नमूद केले. मोदी आवास योजनेप्रमाणे विविध योजनांमधून घरे उपलब्ध होत असून या माध्यमातून मुंबईतून बाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईत आणण्यासाठी प्रयत्न होत असल्याचे ते म्हणाले. आज चाव्या मिळालेल्या गिरणी कामगारांचे त्यांनी अभिनंदन केले.

एकनाथ शिंदे म्हणाले की, सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी सरकार गतिमानतेने काम करीत आहे. यामुळेच ‘सर्वसामान्यांचे सरकार’ अशी या सरकारची ओळख आहे. ज्यांची अंमलबजावणी शक्य आहे असेच निर्णय घेतले जात आहे. सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध प्रकल्प हाती घेतले जात आहेत. रखडलेले पुनर्विकासाचे प्रकल्प मार्गी लावले जात आहेत. त्याचप्रमाणे ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या माध्यमातून एकाच छताखाली योजनांचा लाभ देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.