उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना ‘कलंक’ शब्दाचा वापर केल्याने भाजपा नेत्यांकडून जोरदार हल्लाबोल केला जात आहे. देवेंद्र फडणवीस नागपूरला लागलेला कलंक आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. दरम्यान आता देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरेंची मानसिक स्थिती योग्य नाही असा टोला त्यांनी लगावला आहे.
उद्धव ठाकरे यांच्या टीकेला भाजपा नेते, पदाधिकारी उत्तर देत होते. आता यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, खरं म्हणजे मला या गोष्टीचं अत्यंत दुःख आहे की, आमचे आजचे विरोधक आणि माजी मित्र यांच्यावर आताच्या राजकीय परिस्थितीचा फारच विपरित परिणाम झाला आहे असं दिसतंय. त्यामुळे त्यांना मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा लागेल अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. अशा मानसिकतेमध्ये एखादा व्यक्ती जर बोलत असेल, तर त्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करायला हवं. त्यांची ही मानसिक स्थिती आपण सगळ्यांनी समजून घ्यायला हवी. त्यामुळे मी यावर प्रतिक्रिया देणार नाही. असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
माध्यमांशी संवाद साधण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी एका ट्विटद्वारे उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. त्यात त्यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख कलंकीचा काविळ म्हणून केला होता.
