कवच कुंडल काढल्याशिवाय पर्याय नव्हता, शिवसेना-राष्ट्रवादी फोडणे म्हणजे कूटनीती – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लोक मला म्हणत आहे की, फडणवीसांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडली, एवढेच काय आपल्या भाजप पदाधिकाऱ्यांच्या मनात देखील हा प्रश्न पडला आहे की आपण हे काय करत आहोत तुमच्या मनात असंख्य प्रश्न असणार पण चिंता करू नका, अशावेळी संयम आणि विश्वास या दोन गोष्टीची शिदोरी आपल्याजवळ ठेवा शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडणे म्हणजे कुटनीतीचा भाग आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहे.

युती का तोडली?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या सोबतची युती का तुटली याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचे आश्वासन दिले गेलेच नव्हते.त्या रात्री भाजप नेते अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीत काय चर्चा झाली याचा खुलासा देवेंद्र फडणवीस यांनी केला.भिवंडीतील महाविजय 2024 पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते.

ज्यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली तेव्हा मुख्यमंत्री भाजपचा होईल असा निर्णय झाला होता. तसेच अमित शाह यांनी शिवसेनेला जादा मंत्रीपदांची ऑफर दिली होती. ठाकरेंना अमित शाह यांनी मुख्यमंत्री पदाचा शब्द दिला नव्हता असं फडणवीस यांनी सांगितलं.आम्ही जेव्हा जिंकत होतो, तेव्हा मी नागपूरमधून उद्धव ठाकरे यांना फोन केला की एकत्र पत्रकार परिषद घेऊ. यावर ठाकरेंनी मला मी आता घेतोय तुम्ही नंतर घ्या असे सांगितले होते.त्यांनी आम्हाला सर्व दरवाजे मोकळे असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले होते. मला जेव्हा मध्यरात्री उद्धव ठाकरेंचा फोन आला तेव्हा त्यांनी मुख्यमंत्री पदाचा फॉर्म्युला ठरल्याचे सांगितले होते. मी शहांना तेव्हाच फोन केला होता. त्यांनी तसे काही ठरले नसल्याचे सांगितले. मी पुन्हा उद्धव ठाकरेंना फोन करुन हे सांगितले होते. तेव्हा त्यांनी युती शक्य नसल्याचे कळविले होते, असे फडणवीस यांनी सांगितले.

आम्ही तीन दिवस थांबलो होतो

फडणवीस म्हणाले तरीही आम्ही तीन दिवस थांबलो होतो. विश्वास ठेवला होता. आपण गाफिल राहिलो ही चूक केली. ठाकरेंनी आधीच त्याची तयारी केली होती. पण आज जे आपण करतोय तो अधर्म नाहीय, तुम्ही त्याची चिंता करु नका, तो धर्म आहे. महाभारतानेच हेच शिकवले असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडण्यावरून त्यांनी हे भाष्य केले आहे.

उद्धव ठाकरेंनी पाठीत खंजीरच खुपसला 2019 साली उद्धव ठाकरे यांनी आपल्या पाठीत खंजीरच खुपसला.बेईमानी शिवाय याला दुसरं काही म्हणता येणार नाही. उद्धव ठाकरे यांनी मोदींचे फोटो लावून मते मागीतले.त्यानंतर ते काँग्रेससोबत गेले. भाजपच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारांना जिंकून देण्यासाठी घाम गाळला. शिवसेनेने भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीत खुपसलेला हा खंजीर आहे. अमित शाह म्हणाले दहा अपमान सहन कर पण बेईमानी सहन नको करुस. बाईमानी सहन करणारे राजकारणात टिकत नाहीत, असे देवेंद्र फडणवीस यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.

कवच कुंडल काढल्याशिवाय पर्याय नव्हता

अधर्म नाही ही कुटनीती यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी कर्णाचे उदाहरण दिले. ते म्हणाले, कर्णाची कवचकुंडले काढून घेतल्याशिवाय कर्णावर विजय मिळविता येणार नाही, हे कृष्णाला माहिती होते. भीष्माला पराभूत करण्यासाठी शिखंडीला उतरविले. सुर्यास्त भासविला, द्रोणाचार्यांना जेव्हा अश्वत्थामा गेला असे सांगायचे होते, तेव्हा नरोवा कुंजरोवा हे सांगताना एवढ्या जोरात शंख वाजवला की त्यांना फक्त अश्वत्थामा गेला एवढेच ऐकायला गेले. हा अधर्म नाहीय ही कुटनीती आहे. जेव्हा जेव्हा बेईमानी होईल तेव्हा तेव्हा कुटनीती वापरावीच लागेल,असं फडणवीस यांनी सांगितले.कुटनीती वापरली तर युद्धात विजय मिळेल अनेकजण नैतिकतेचा प्रश्न उपस्थित करत आहेत.कुठे कुटनीती वापरली तरच युद्धात विजय मिळतो, हे कृष्णाला माहित होते.लोक म्हणतात दोन पक्ष फोडले,घर फोडले. मला सांगा सुरुवात कोणी केली. पक्ष फोडल्याचे संगातायत मग मला सांगा एकनाथ शिंदे आणि अजित पवार काय काल राजकारणात आले आहेत का? मी त्यांच्यावर मोहिनी घातली का? जेव्हा पक्षात अन्याय होत असतो तेव्हा तेव्हा शिंदे जन्माला येतील असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला. शिवसेनेसोबतची इमोशनल युती आहे, राष्ट्रवादीशी राजकीय. कदाचित पुढील 10-15 वर्षात ती देखील इमोशनल युती होईल, असेही फडणवीस म्हणाले.