बोगस बियाणे- खते विक्रीविरोधात कायदा करण्यासाठी समिती गठीत – कृषी मंत्री धनंजय मुंडे

राज्यात बोगस बियाणे, खते, कीटकनाशके यांची विक्री करणाऱ्या काही जणांवर अलीकडे कारवाई झाली आहे, मात्र बोगस बियाणे-औषधे विक्री करणाऱ्यांविरोधातील अधिक कडक कायदा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. तर चालू पावसाळी अधिवेशनातच बोगसगिरी करणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याचा अधिक कडक कायदा अस्तित्वात आणला जाईल, अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज मुंबई येथे पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाचे कामकाज संपल्यानंतर माध्यमांशी बोलताना दिली.

मागील काही दिवसांपासून बोगस बियाणे आणि खतांची विक्री राज्यातील अनेक भागांमध्ये झाल्याचं उघड झालं आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये बोगस खते व बियाणे वाटप केल्याप्रकरणी हजारो शेतकऱ्यांचं नुकसान झालं. या संदर्भात मंत्री गिरीश महाजनांनी कॅबिनेटमध्ये मुद्दा उपस्थित केला.हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर दोषींवर कडक कारवाई करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती कायदा तयार करेल आणि दोषीं विरोधात कडक कारवाई करेल, असं कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटलं. या समितीमध्ये कृषी मंत्री धनंजय मुंडे, मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा समावेश असेल.

धनंजय मुंडे म्हणाले की, जळगावसह इतर जिल्ह्यातील प्रकरणे समोर आली आहेत. जे बियाणे देण्यात आले ते बनावट आहे. खतं देखील बनावट देण्यात आली आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं मुंडे यांनी मान्य केलं.