ईडी, इन्कम टॅक्सच्या भीतीने आम्ही भाजपाबरोबर गेलो, हे लोकांमध्ये पसरवलं जातंय – मंत्री धनंजय मुंडे

महाराष्ट्राच्या राजकारणात २ जुलै २०२३ ला मोठी उलथापालथ झाली. अजित पवार यांच्यासह ९ आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली. या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. अजित पवारांसह आमदारांनी केलेल्या बंडावर कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.

महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसचाच शब्द चालत होता. ही आघाडी अभेद्य राहून एकत्रितच निवडणुकांना सामोरे जाईल अशी प्रत्येकाचीच धारणा झालेली असतानाच अचानक हा भूकंप झाला. तसे पाहिले तर सारेकाही आधीच ठरले होते. मात्र जनतेच्या दृष्टीने ही घटना अनपेक्षित अशीच होती. असं नेमकं घडलं तरी काय की ज्यामुळे अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केलं, राष्ट्रवादीच्या आमदारांना शरद पवार यांची साथ का सोडावी लागली असे प्रश्न आजही लोकांच्या मनात घोळत आहेत. याच प्रश्नांची उत्तरे आता राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी मुंबई तकच्या चावडी कार्यक्रमात दिली.

शरद पवार हे आमचे दैवत आणि आधार आहे. भाजपसोबत जाणं आणि त्यांना पाठिंबा देणं, ही आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून भूमिका घेतली आहे. अजित पवार यांनी ०५ जुलै रोजी झालेल्या मेळाव्यामध्ये याबद्दल स्पष्ट भूमिका मांडली आहे.राष्ट्रवादीच्या उभारणीत स्वाभिमान हा मुख्य विषय होता. आमचा पक्ष लोकशाही मानणारा आहे. आमच्यासाठी शरद पवार कायमच आधारस्तंभ आणि दैवत आहे.

“ईडी, इन्कम टॅक्सच्या नोटीसा आज नाहीतर, गेल्या अनेक वर्षापासून आल्या आहेत. मात्र, याच्या भीतीने आम्ही भाजपाबरोबर गेलो, हे लोकांमध्ये पसरवलं जातं. राष्ट्रवादीच्या उभारणीत स्वाभीमान हा विषय होता. हा पक्ष लोकशाही मानणार आहे. आमच्यासाठी दैवत आणि आधारस्तंभ शरद पवारच आहेत. लोकप्रतिनिधींची कामे आणि मतदारसंघाचा विकास होणे याला आमदार म्हणून आम्ही उत्तरदायीत्व आहे,” असं धनंजय मुंडे यांनी सांगितलं.