शहापूर दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शहापूर सरलांबे येथे समृध्दी महामार्गावर मध्यरात्री क्रेन कोसळून झालेल्या अपघातावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केले आहे. या दुर्घटनेत आत्तापर्यंत 17 जण मरण पावल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. या घटनेतील मृत कामगारांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. तर जखमींवर तातडीने शासकीय खर्चाने योग्य ते उपचार करावेत असे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुण्यात असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताच्या तयारीत व्यस्त आहे. समृद्धी महामार्गावरील क्रेन दुर्घटनेचं वृत्त समजताच त्यांनी जिल्हा प्रशासन तसेच संबंधित अधिकारी यांच्याशी बोलून घटनेविषयी जाणून घेतले. हा अपघात अतिशय दुर्दैवी असून त्याची सखोल चौकशी करण्यासही त्यांनी सांगितले आहे.

सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे यांच्याशी बोलून त्यांना तातडीने दुर्घटनास्थळी रवानाही केले. एनडीआरएफ चे पथक याठिकाणी पोहचले असून बचाव कार्य करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. पावसाळा असल्याने अधिक खबरदारी घेण्यास सांगितले आहे. समृध्दी महामार्गाचे तिसऱ्या टप्प्याचे काम सुरू असताना हा अपघात घडला अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी ट्वीटच्या माध्यमातून दिली आहे.

ठाण्याजवळ शहापूर तालुक्यातील सरलांबे इथं समृद्धी महामार्गाचं काम सुरु असताना मोठी दुर्घटना घडलीय. पुलाचं काम सुरु इसताना गर्डर मशिन कोसळून 17 कामगारांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची तज्ज्ञांमार्फत चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. दरम्यान, यामध्ये मृत झालेल्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली आहे. तसेच मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधीतून दोन लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत केली जाणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.