जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात शुक्रवारी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराचे तीन जवान शहीद झाले. दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील हलान वनक्षेत्रात शोध मोहीम सुरू केली होती. त्यावेळी झालेल्या चकमकीत तीन जवांनाना वीरमरण आलं आहे. जखमी झालेल्या तीन जवानांचा मृत्यू झाला आहे. तर शोध मोहीम सुरूच आहे, अशी माहिती भारतीय लष्कराने दिली.
एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील हलान जंगल परिसरात अतिरेकी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली. दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केल्यानंतर शोध मोहिमेचं चकमकीत रूपांतर झालं. जवानांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं.
याआधी एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत पूँछ आणि राजौरी या दोन जिल्ह्यांमध्ये झालेल्या चकमीत दहा जवान शहीद झाले. या वर्षाच्या सुरुवातीलाच राजौरी या ठिकाणी दहशतवाद्यांनी काही हिंदू कुटुंबांवर हल्ला केला. या घटनेत सात निर्दोष लोकांचा मृत्यू झाला आणि १२ हून अधिक लोक जखमी झाले. गेल्या काही दिवसांपासून जम्मू आणि काश्मीरमध्ये अतिरेक्यांच्या कारवाया वाढल्या आहेत. त्यामुळे या भागात जवानांची गस्त वाढवण्यात आली आहे. सीमेपलिकडून हे अतिरेकी येत असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे जवानांकडून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक संशयित व्यक्तीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामुल्ला येथील इम्रान अहमद नजर, श्रीनगर येथील वसीम अहमद मट्टा आणि बिजबेहारा येथील वकील अहमद भट अशी अटक करण्यात आलेल्यांची नावं आहेत. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडून तीन हातबॉम्ब, 10 राउंड पिस्तूल, 25 एके-47 रायफल आणि इतर आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
