मुंबई लोकल ट्रेनमध्ये साखळी स्फोटांची धमकी; पोलिसांना आलेल्या फोनने राज्यात खळबळ

मुंबई पोलिसांना येणाऱ्या धमक्यांचे फोन काही थांबण्याचं काही नाव घेत नाहीये. आज म्हणजेच रविवारी सकाळी पुन्हा एकदा मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमचा फोन खणाणला. मुंबईतील लोकल ट्रेनममध्ये लवकरच साखळी बॉम्बस्फोट होणार, अशी धमकी फोन करणाऱ्या व्यक्तीने दिली. इतकंच नाही तर, आपण लोकलमध्ये बॉम्ब ठेवला असल्याचं या व्यक्तीने सांगितलं. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे.

अधिक माहिती अशी की, यावेळी महिला पोलिस शिपायानं संबंधित व्यक्तीकडून अधिक चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता त्याने कोणतेही उत्तर दिले नाही. मात्र कुर्ला, ठाणे, कल्याण टिळकनगर अशी वेगवेगळी ठिकाणं सांगितली.त्या व्यक्तीला त्याच्या ठिकाणाबाबत विचारले असता, त्यानं तो जुहू विलेपार्ले परिसरातून बोलत असल्याचं सांगत फोन कट केला. काही वेळानं फोन करणाऱ्यानं त्याचा मोबाईल बंद केला होता.

पोलिसांनी अधिक तपास केला असता या व्यक्तीने जुहूच्या शाह हाऊस मोरगांव येथून फोन केल्याचं समजले. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी संबधित स्थानकावरील सुरक्षा यंत्रणांना सतर्क राहण्याबाबत कळवले आहे. दरम्यान, कुणीही घाबरून जाऊ नये, असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.