‘सामना’ विरोधात भाजप आक्रमक; सामना वृत्तपत्राविरोधात न्यायालयीन लढाई लढणार – चंद्रशेखर बावनकुळे

आजच्या सामनाच्या अग्रलेखातून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस ‘उप’मुख्यमंत्री झाल्याने असंवेदनशील, अहंकाराचे महामेरू बनले आहेत. एका चांगल्या माणसाच्या झोकांडय़ा जात आहेत. फडणवीस, सांभाळा!, असं आजच्या सामनात म्हणण्यात आलं आहे. त्यावरून भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सामना विरोधात न्यायालयात जाणार असल्याचं म्हटलं आहे. सामनावर बोलताना उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावरही बावनकुळे यांनी टीका केली आहे.

नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, सामना वृत्तपत्राविरोधात आम्ही तक्रार करणार आहोत. रोज रोज हे वृत्तपत्र जी आग ओकतोय, ती थांबवावीच लागेल. त्यासाठी काय करायचे, याबाबतही आम्ही लवकरच भूमिका स्पष्ट करणार आहोत. कोर्टात आणि रस्त्यावरही लढाई करण्याचा आम्ही विचार करतोय. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, किंचित सेनेचे पक्षप्रमुख आणि वैफल्यग्रस्त उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून बोरूबहाद्दर संजय राऊत यांनी आज सामनातून देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात गरळ ओकली. एखाद्याच्या खासगी जीवनावर, व्यक्तिगत टीका करण्याचा कोणताही अधिकार त्यांना नाही. अशा प्रकारचे स्वातंत्र्य खपवून घेतले जाणार नाही.

सत्ता गेल्यापासून उद्धव ठाकरे बावचळलेत, त्यांचं डोकं काम करत नाहीये. पुन्हा सत्तेत यायची संधी नाहीये. पक्ष फुटलाय, पक्षाचं चिन्हही गेलंय. आता महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आली आहे. त्यामुळे आता आयुष्यात कधीही सत्तेत येऊ शकत नसल्याचं त्यांना दु:ख आहे. त्यामुळे त्यांना दोन प्रकारचं दु:ख आहे. एक सत्ता गेल्याचं आणि दुसरं कधीही सत्तेत न येण्याचं, अशी बोचरी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलीये. वृत्तपत्रात लिहिण्याला काही मर्यादा असते. त्यामुळे मुंबईचे कार्यकर्ते ‘सामना’ विरोधात आंदोलनाचा पवित्रा घेणार आहेत. ‘सामना’ जी आग ओकत आहे, ती आम्हाला थांबवावीच लागणार आहे. लवकरच याबाबत भूमिका स्पष्ट करणार आहोत. सामना वृत्तपत्राचे अधिकार किती आहेत. ते अधिकार कसे वापरतात याचा पुढच्या काळात विचार करणार आहोत, असं ते म्हणाले.