शरद पवारांना मराठा आरक्षणाबाबत एवढं वाटत असेल तर त्यांनी आझाद मैदानात उपोषण करावं – सदाभाऊ खोत

गेल्या काही दिवसापासून जालन्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानं विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर या आरक्षणाला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळाला. अखेर या आंदोलनपुढं सरकारनं नमतं घेत मराठा समाजाला कुणबी जातीचं प्रमाणपत्र देण्याचं कबुल केलं. मात्र, अद्याप मराठा आरक्षण मिळालं नाही. अशातच आता रयत संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर टीका केली. शरद पवारांना आरक्षणाबाबद एवढं वाटत असेल तर त्यांनी उपोषणाला बसावं, असं खोत म्हणाले.

आरक्षणाच्या प्रश्नावर शरद पवार आता मगरिचे अश्रू ढाळतायेत असा आरोप खोत यांनी केला. मराठा समाजाच्या प्रस्थापित नेत्यांनी मराठा समाजाची माती केली. २००४ साली बापट आयोग कोणी स्थापन केला. बापट आयोगानं आरक्षण देता येणार नाही असं सांगितलं तरी हा आयोग का स्विकारला असा सवाल त्यांनी केला. आघाडी सरकारच्या काळात पवारांनी मराठ्यांच आरक्षण घालवलं असा आरोपही त्यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांची ब्राह्मण जात आहे त्यामुळेच त्यांच्यावर खापर फोडण्याचा प्रयत्न विरोधक करतायेत अशी टीकाही खोत यांनी केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार काल मराठवाड्यातील मराठा समाजाला मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया निश्चित करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांची समिती नेमण्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला. याशिवाय मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेण्याचीही विनंती करणारं सचिव सुमंत भांगे यांचे पत्रही देण्यात आलं.