मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्याशी मंत्री गिरीश महाजन यांनी सफोनवरून संपर्क केला. उपोषण करु नका, असं आवाहन मंत्री गिरीश महाजन यांनी केलं आहे. तुम्ही एक महिना मुदत मागितली. तुमच्या शब्दाला मान देत आम्ही एक महिन्याऐवजी 41 दिवस दिले, आता अडचण काय आहे, आमचं काय चुकलं, असा सवाल जरांगे यांनी महाजन यांना केला आहे.
यावेळी गिरीश महाजन यांच्याकडून मनोज जरांगे पाटलांची समजून काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. गिरीश महाजन म्हणाले की, उपोषण करु नका, आरक्षणावर मार्ग काढू. आपला जीव धोक्यात घालू नका. आम्हाला थोडा वेळ द्या. सरकारला सुद्धा आरक्षण द्यायचे आहे. वेळ दिला तर टिकणारे आरक्षण देऊ. नियमान राहून आरक्षण देणार. तुमचे 3-4 विषय आठवड्याभरात मार्गी लावणार. आरक्षण कोर्टात टिकलं पाहिजे ही सरकारची भूमिका. असे गिरीश महाजन म्हणाले.तुम्ही उपोषण मागे घ्या, आपण मार्ग काढू, मराठा आरक्षणासाठी सरकार गंभीर आहे. देऊन टाका, देऊन टाका, असं आरक्षण देता येणार नाही. आम्हाला असं आरक्षण द्यायचं आहे, त्याला कुणीही चॅलेंज करु शकत नाही. न्यायालयात आव्हान देता येणार नाही. त्यासाठी आम्हाला थोडा वेळ द्या, समाजाला आंदोलन उग्र करु नका, आत्महत्या करु नका, असं मराठा समाजाला आवाहन करण्याची मागणी गिरीश महाजन यांनी केली आहे.
यापूर्वीच मंत्री गिरीश महाजन यांनी सरकारतर्फे बोलणी करण्यासाठी जरांगे पाटील यांना फोन केला आणि उपोषणाची घोषणा न करण्याची विनंती केली. मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे ही सरकारची प्रामाणिक भावना आहे. त्यासाठी सरकार प्रयत्नही करत आहे. मात्र न्यायालयात टिकणारे आरक्षण द्यायचे असल्याने काहीसा वेळ लागत आहे. मी मुख्यमंत्री महोदयांशी तुमचे बोलणे करुन देतो, असे सांगत महाजन यांनी जरांगे पाटील यांची समजुत घालण्याचा प्रयत्न केला.
