‘अग्निवीर’ अक्षय गवते यांच्या कुटुंबाला राज्य शासनातर्फे दहा लाख रुपयांची मदत

सियाचीनमध्ये कर्तव्य बजावताना महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील अग्निवीर अक्षय गवते यांचा मृत्यू झाला. अक्षयच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त करतानाच त्यांच्या कुटुंबियांना राज्य शासनातर्फे दहा लाख रुपयांची मदत जाहीर केल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

अक्षय गवते हे बुलढाणा तालुक्यातील पिंपळगाव सराई गावातील रहिवासी होते. त्यांच्या निधनाने संपूर्ण गावावर शोककळा पसरली. ३० डिसेंबर २०२२ रोजी अक्षय अग्निवीर म्हणून भारतीय सैन्यदलात भरती झाले होते. सियाचीनमधील याचीन ग्लेशियरमध्ये ते कर्तव्यावर होते. जिल्हा सैनिक कार्यालयाला प्राप्त माहितीनुसार, अक्षय यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना सैनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांना हृदयविकाराचा धक्का आला त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

अक्षय हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्यांना एक लहान बहिण असून त्यांचे आई-वडील शेती करतात. प्रचंड मेहनत आणि जिद्दीने अक्षय अग्निवीर म्हणून सैन्यदलात भरती झाले होते.महाराष्ट्राच्या पहिल्या अग्निवीराला वीरमरण आल्यानं हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अक्षयच्या निधनाबद्दल त्याच्या कुटुंबियांप्रती मुख्यमंत्र्यांनी सहवेदना व्यक्त केली आहे.