वारकरी संप्रदायावर शोककळा : ज्येष्ठ किर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचे निधन

आपल्या कीर्तनातून महाराष्ट्राला मंत्रमुग्ध करणारे ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प.बाबा महाराज सातारकर यांचे दुःखद निधन झाले आहे. वयाच्या ८९व्या वर्षी मुंबईतील नेरूळ येथील निवासस्थानी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने संपूर्ण वारकरी संप्रदाय शोकसागरात बुडाला आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या शुक्रवारी २७ ऑक्टोबरला संध्याकाळी 5 वाजता नेरुळ येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. दरम्यान, बाबा माहाराज सातारकर यांचं पार्थिव आज दुपारी तीननंतर अंतिम दर्शनासाठी नेरूळ जिमखाना समोर असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदीरात ठेवण्यात येईल.

जेष्ठ निरुपणकार बाबा महाराज सातारकर यांनी आपलं आयुष्य अध्यात्माच्या प्रचार प्रसारासाठी अर्पण केलं. रोखठोक वाणी आणि शुद्ध विचार हे बाबा महाराज सातारकर यांचं व्रत होतं. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी जनसामान्यांचं प्रबोधन केलं. दरम्यान, यावर्षीच्या सुरुवातीलाच फेब्रुवारी महिन्यात बाबा महाराज सातारकर यांच्या पत्नी रूक्मिणी सातारकर ऊर्फ माई सातारकर यांचं निधन झालं होतं. त्यानंतर 8 महिन्यानंतर बाबा महाराज सातारकर यांचीही प्राणज्योत मालवली.

विठ्ठलाचे कीर्तन आणि ज्ञानेश्वरी यावर बाबा महाराजांनी आयुष्य घालवलं. बाबा महाराजांचं कीर्तन ऐकण्यासाठी राज्यातीलच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून भक्त जमत होते. अलिकडे वय झाल्यामुळे बाबा महाराज कीर्तनासाठी उभे राहात नव्हते. त्यांची ही परंपरा त्यांचा नातू पुढे नेत आहे.

बाबा महाराज यांच्या घरात गेल्या १३५ वर्षांपासून वारकरी सांप्रदयाची परंपरा आहे. बाबा महाराज सातारकर यांचं इंग्रजी माध्यमात एसएससीपर्यंत शिक्षण झाले होते. तर ८व्या वर्षांपासून ते कीर्तनात अभंगाच्या चाली म्हणायचे. बाबा महाराज यांच्याकडे गेल्या ८० वर्षांपासून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात मानकरी परंपरा आहे. तर तुकारम महाराज पालखी सोहळ्याबरोबर मानकरी परंपरा १०० वर्षांपासून राखली आहे.